अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आषाढी वारीत सहभागी दिंडी व वारकर्यांच्या नियोजनासाठी, त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रत्येक दिंडीने त्यांच्यासोबत निघालेल्या वारकर्यांची संख्या, मुक्कामाच्या ठिकाणीची माहिती नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 25 जूनपूर्वी करावी, म्हणजे नियोजन करणे सोपं जाईल, असे आवाहन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता वारीतील प्रवासादरम्यान वारकर्यांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडी प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणांहून अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यामार्गे पंढरपूरकडे जातात. श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणार्या दिंड्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. वारी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करण्यात यावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा.
मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच अखंडित वीजपुरवठा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. सोलापूर जिल्ह्यांतही वारकर्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी व प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही ते म्हणाले. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्यांनी आपल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला जिल्ह्यातील मानाची दिंडी असणार्या नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी नेवासा, शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज पालखी पैठण, संत निळोबाराया पालखी (पारनेर) आणि विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर यांचे प्रतिनिधींसह अन्य लहानमोठ्या दिंड्यांचे प्रतिनिधी हजर होते.
दिंड्या नियोजनासाठी अधिकार्यांची संपर्कसूची
दिंडी मार्गावर आवश्यक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये वारकर्यांच्या मोफत उपचाराची सोय करावी. वारकर्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपचार तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक दिंडीसाठी संपर्क अधिकार्यांची नेमणूक करण्याबरोबरच दिंड्यांच्या मुक्कामाचे नियोजन व संबंधित अधिकार्यांचे संपर्क क्रमांक असलेली संपर्कसूची तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रस्ते, पाणी, मंडप आणि आरोग्य सुविधा द्या
जिल्ह्यातून जाणार्या चार मानाच्या दिंड्यासह अन्य शेकडो दिंड्या मार्गस्थ होतात. या दिंड्या मार्गाची दुरूस्ती, दिंड्यांना पाणी, फिरते शौचालय, फिरते स्नानगृह, मंडळ, स्वयंपाकासाठी गॅस, मुक्कामासाठी शाळांच्या इमारती अथवा वॉटरफु्रप मंडप, दिंडी मार्गावर औषध उपचारांसह प्रत्येक ठिकाणी दिंडीचे शासकीय स्वागत व्हावे, अशी अपेक्षा बैठकीला उपस्थितीत दिंड्याच्या प्रतिनिधींनी केली.
दिंड्यांसाठी 3 कोटी 86 लाखांचा निधी
जिल्ह्यातील दिंड्यांच्या नियोजनासाठी यंदा 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मागील वर्षी हा निधी 2 कोटी 64 लाख रुपये होता. यंदा दिंड्यासाठी 1 कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आलेला असून पंढरपूरमध्ये मोठ्या दिंड्याच्या मुक्कामाची व्यवस्था असते. केवळ लहान दिंड्याचा प्रश्न असून त्यासाठी सोलापूरचे मंत्री विजयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक घेवून नियोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.




