मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आता पत्रकारांचे प्रश्नही बोचू लागले आहेत. संजय दिना पाटील हे भडकले, संतापले आणि रागाच्या भरात त्यांची जीभ चांगलीच घसरली. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर अरेरावी केली तसेच त्यांना शिवीगाळही केली. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटील यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकीही दिली.
“मी खासदार आहे हे विसरून जाईन… यापुढे जर माझ्याकडे आलात, तर मार खाणार!” अशा अत्यंत अर्वाच्य भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट धमकी दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर खासदारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच पत्रकारांना दमदाटी करायला सुरुवात केली.
हा सर्व खळबळजनक प्रकार पत्रकारांच्या कॅमेऱ्यात जशास तसा रेकॉर्ड झालाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. “जाऊन कमिशनरकडे कम्प्लेंट करा, मी कोणाला घाबरत नाही,” असं म्हणत खासदारांनी पत्रकारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय पाटील?
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार संजय पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. कॅमेरा आणि माईक बंद करायला सांगत त्यांनी “मी खासदार आहे हे विसरून जाईन, खूप दिवस सहन केलं, आता उगाच डोक्यात जाऊ नका” असा सज्जड दम भरला.
संजय पाटील यांनी म्हटले की, माझे ते वक्तव्य पुन्हा पाहा…पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले तरी मी जाईल. मला काय विचारणा झालं तर मी जाईन बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेऱ्यावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय. कॅमेऱ्यावर बोललोय, जे बोललोय जे आहे ते समोर जाणार…असल्याचे पाटील यांनी सांगितले. हे जे करणार ते भोगणार असेही पाटील यांनी म्हटले.
त्यानंतर संजय पाटील यांच्यावर पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. त्यावर संजय पाटील यांना संताप अनावर झाला.
पत्रकारांच्या प्रश्नावर संतापलेल्या संजय दीना पाटील यांनी म्हटले की, इज्जत करतोय, इज्जत करा! काय होतोय परत? तुम्ही उगीच माझ्या XXX बोट घालतायत. मी घे, रेकॉर्ड कर! इज्जत करतो, उगीच डोक्यात जाऊ नका. उगीच डोक्यात जाऊ नका, घराखाली उभा राहू देतोय, काय? उगीच त्यांच्याकडे चल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचंय ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, हा सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, बाजूला कशाला XXX घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली ना ती, सांगितलं ना सर्व , अशा शब्दात संजय पाटीलांची जीभ घसरली.
माझा शिवसैनिकांसोबत कोणताही वाद नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी खासदार झालो. जे नेते माझ्याविरोधात बोलत आहे, ते स्वत:ची सुरक्षा सोडून इकडे काही करायला येणार आहेत का? हे काही करणार, तेव्हा आम्ही मार खाऊन घ्यायचा का? हे लोक स्वत:च्या दादा लोकांकडून फोन करतात, सिक्युरिटीसाठी, ती केस पण दाबून टाकली. ती केस काढायला सांगा ना. मी संजय राऊत यांना खूप मानसन्मान दिलाय. 2004 मध्ये शिवसेनेच्या लीलाधार डाके यांच्याविरोधात मी निवडून आलो तेव्हा संजय राऊत यांनी मला मदत केली. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही त्यांनी मला मदत केली होती. ही शिवसेनेविरोधात गद्दारी नव्हती का? मी आम्ही पाच लोकं मारली, जे बोललो ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला दहा लोकं लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो. शिंदे साहेबांनी माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट मला शाबासकी दिली. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे, मर्दांची कदर करतात, ते नाराजी व्यक्त करत नाहीत, शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली आहे, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.




