पुणे | Pune
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात गुरुवारी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयात या प्रकरणात २९ जूनला अंतिम शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने नराधम आरोपी भीमराव कांबळे याला या प्रकरणी दोषी ठरवले आहे.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
राज्याच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगाने निकाल लागलेला हा पहिलाच खटला असल्याचं मानले जातेय. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे या ६५ वर्षीय नराधमाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याचा निकाल देत दोषी ठरवले आहे.
न्यायाधीशांचा कांबळेला प्रश्न तुला कोणती शिक्षा द्यायची?
अंतिम सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा केली. त्यावर मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो, त्या मुलीच्याही डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती सारखी ओरडत असल्याचा बनाव केला. त्यावर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याला तू जे सांगत आहे, तो इतिहास झाला आहे, तुझ्यावर आता गुन्हा सिद्ध झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने कोणतेच उत्तर दिले नाही.
नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी
न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे.
सरकारी वकीलांचा युक्तीवाद
भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आले असल्याचे सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखमा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. आरोपीचा आतापर्यंतचा इतिहास आणि पार्श्वभूमी बघता हा आरोपी सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे, असं कोर्टाने म्हटलं. अनेक पुरावे आणि साक्षीदार पाहून आरोपीचा हा गुन्हा सिद्ध झाला आहे.
समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुह्याच्या खटल्यांचा आणि त्यामधे सुनावण्यात आलेल्या खटल्यांचा संदर्भ देण्यात आला. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली आहे.
प्रकरणाच्या सुरूवातीलाच न्यायाधीशांनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवलं. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी वकील प्रयत्न करत होते. यावेळी त्याचं कुटुंबही त्याच्या सोबत नव्हतं. आरोपीला सात मुलं आणि पत्नी आहे, मात्र कोणीही कोर्टात हजर राहिले नाही.
दुसरीकडे सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीच्या वर्तनावरही भाष्य केले. आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. न्यायालयाने त्याला अनेक प्रश्न विचारले, मात्र त्याने कोणतीही स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. आरोपीची मानसिक स्थिती आणि लैंगिक क्षमता यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले असून त्यातून आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तसेच लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले. आता या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेतील प्रकरणात न्यायालय २९ जून रोजी शिक्षेबाबत अंतिम निर्णय देणार आहे.




