मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली आहे. “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने २४० च्या संख्येवर मर्यादित ठेवले”, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे. तर या आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीदेखील भाजपला कानपिचक्या दिल्या होत्या. यावरुन आता संघाकडून देशाला आणि जनतेला अपेक्षा असल्याचे मत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील नेत्यांची अलीकडची काही वक्तव्ये मी ऐकतोय. परवा सरसंघचालक मोहन भागवत देखील भाजपावर बोलले. ते म्हणाले, ‘लोकसेवकाने अहंकार बाळगू नये’. परंतु, आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला आहे. केवळ ईर्ष्या, सूडाचे राजकारण, सत्तेचा गैरवापर पाहिला आहे. आम्ही हे पाहत असताना भाजपाची मातृसंस्था असलेली आरएसएस देखील हे सगळे शांतपणे पाहत होती. गेल्या १० वर्षांमध्ये आम्हाला आरएसएसकडून खूप अपेक्षा होत्या. आम्हाला वाटत होते की सरसंघचालक आणि संघाचे इतर लोक निर्भयतेने पुढे येतील, सूडभावनेने चालू असलेले राजकारण थांबवण्याचा प्रयत्न करतील. ही या देशातील जनतेची अपेक्षा होती, त्याचप्रमाणे आम्हा विरोधी पक्षांची देखील अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. RSSने ठरवले तर मोदींचे सरकार १५ मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा : ‘त्या’ प्रकरणात उद्धव ठाकरे, संजय राऊतांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड
जेव्हा १९७५ साली आणीबाणी घोषित झाली तेव्हा तत्कालीन सरसंघचलाकांनी त्या आणीबाणीचा विरोध केला होता. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघाच्या काही लोकांनी अमूल्य योगदान दिले, त्यासाठी ते तुरूंगातही गेले. पण गेल्या १० वर्षांत अतिशय विरुद्ध परिस्थिती पहायला मिळाली. मात्र अहंकाराचे हे राजकारण जनतेने रोखले आहे. येत्या काळात आरएसएसची भूमिका राहील आणि सत्तेवर जे अहंकारी नेते बसले आहेत, त्यांना तुम्ही लवकरच सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न कराल, असा आम्हाला विश्वास आहे, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले.
“अण्णा हजारे यांचे अभिनंदन करतो”
“अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण महाराष्ट्रात शिखर बँक हा एकच घोटाळा झाला नसून गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याविरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवून रामलीला मैदानावर उपोषणाला बसावे. आमच्या त्यांना पाठिंबा असेल, असेही राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर https://chat.whatsapp.com/IDcUzHfdO8IENPnZP1HrFpक्लिक करा