नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना पक्ष ठाकरेंचा आहे, तो एकनाथ शिंदे यांचा पक्ष होऊच शकत नाही. त्यामुळे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांचे होऊच शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मोठी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. पक्ष कुणाचे आणि चिन्ह कुणाचे असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आणि त्यावर गेली चार वर्षे कायदेशीर खल सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या युक्तिवादाच्या अखेरच्या क्षणी धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
गेले सात दिवस चाललेला युक्तिवाद संपवताना शेवटी कपिल सिब्बल म्हणाले की, मी या ठिकाणी प्रकरणातील दोन परिच्छेद वाचून दाखवू इच्छितो. पक्षांतर करणे हे पाप आहे. त्यामुळे पक्षांतराला थारा देण्यासाठी दहाव्या सूचीचे असे अर्थ काढू नका. कर्नाटकबाबतच्या निकालातही हेच म्हटले आहे. तसेच शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष आहे, शिवसेना ही शिंदेंची होऊ शकत नाही, शिंदेंनी तिचा फायदा घेतला, असा दावाही केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाने घालून दिलेले नियम कसे पायदळी तुडवले, हे सांगण्याचा प्रयत्न सिब्बल यांनी केला.
जर त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळू शकत नसेल आणि आम्हालाही ते चिन्ह मिळू शकत नसेल, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवले पाहिजे. हा माझा पर्यायी युक्तिवाद आहे. ज्या लाभाचा उपभोग घेण्याचा त्यांना (एकनाथ शिंदे) कधीच हक्क नव्हता, त्याच लाभावर एकनाथ शिंदे यांचा गट न्यायाचा दावा करू शकत नाही, असे सिब्बल म्हणाले.
तर ते चिन्ह गोठवले पाहिजे
यावेळी युक्तिवादाचा शेवट करताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत कपिल सिब्बल यांनी मोठी मागणी केली. सिब्बल म्हणाले की, शिवसेना हे नाव ठाकरे यांचेच आहे, असा निर्णय माननीय न्यायालयाने द्यावा. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेसेनेला मिळता कामा नये, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत. शिंदेसेनेकडून धनुष्यबाणाचा ज्याप्रकारे वापर सुरू आहे, ते न्याय्य नाही. शिंदेसेनेकडून धनुष्यबाणाचा होत असलेला वापर हा बेकायदेशीर आहे. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह जर शिंदेंना मिळू शकत नसेल आणि ठाकरेंनाही मिळू शकत नसेल तर ते चिन्ह गोठवले गेले पाहिजे, अशी मागणी करत कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला.




