मुंबई | Mumbai
“उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईचे आम्ही स्वागतच करतो. पण नरेंद्र मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का? मोदी ३० तारखेला १० कॅमेरे लावून ध्यानाला बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या २४ तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते. ती देखील नरेंद्र मोदी यांची ‘मूक पत्रकार परिषद’च होती. अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
निवडणूक आयोगाच्या या कारवाईच्या आदेशावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, १७ पत्रांपैकी एकाही पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्रात यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे, पैशांचे वाटप सुरु आहे. मुख्यमंत्री, भाजपाचे नेते यांच्यासंदर्भातल्या या तक्रारी आहेत. याची दखल घेण्यात आलेली नाही. मात्र २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यासंदर्भात भाजपाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि केंद्रीय निवडणूक आयोग किती तत्परतेने कारवाईचे आदेश देतो, आम्ही या कारवाईचे स्वागत करतो. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. निवडणूक आयोग ही भाजपाची विस्तारित शाखा आहे, ती निष्पक्ष नाही, घटनेनुसार काम करत नाही. उद्या संध्याकाळनंतर त्यांना या सगळ्याची उत्तरे द्यावी लागतील,” असे संजय राऊत म्हणाले.
‘काठावर ज्या निवडणुका होतील, दोन-पाच हजार वीस हजार, त्या ठिकाणी गृहमंत्रालयाकडून फोन गेले आहेत. ही माझी पक्की माहिती आहे. जयराम रमेश ज्या १५० लोकसभा मतदारसंघाची भाषा करत आहेत, त्यातले १२ मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत’,असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
भाजप कार्यकर्त्यांकडून उद्याच्या निकालाआधी मिठाई बनवायला सुरूवात झाली आहे, त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. भाजप उद्या हारत आहे. लाडू बनवा, हलवा बनवा, बासूंदी बनवा. रगडा पॅटिस वाटा, फाफडा वाटा, उद्या घेऊन या. लोक तुमच्या पराभवाचा जल्लोष करतील’, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
पंतप्रधानपदावर आमच्या आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. उद्या सगळे निकाल लागले आणि इंडिया आघाडीचा विजय जाहीर झाला की आम्ही पंतप्रधानपद ठरवू. लोकांना मोदी सध्या भ्रमात टाकत आहेत, उद्यापासून ते माजी पंतप्रधान असतील.