
नाशिक | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर २.०'(Operation Tiger 2.0) राबवून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे ६ खासदार आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना पक्षात घेतले होते. या मोठ्या धक्क्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. हा धक्का ताजा असतानाच, आता शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर ३’ च्या तयारीत असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये(Operation Tiger Nashik) ठाकरेंच्या शिवसेनेच्या १० ते १२ नगरसेवकांसाठी (Shivsena Thackeray Group Corporator) शिंदेंच्या शिवसेनेने गळ टाकला असल्याच्या चर्चा सुरु आहे. नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वर्तुळात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांच्या शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकिय भूकंप घडण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधी त्यांना दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आला आहे. जर ठाकरेंचे नगरसेवक शिंदेगटात गेले तर नाशिकमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढेल अशी चर्चा सुरु आहे.
निधी दिला जात नाही हे खरं, पण…
मात्र अशी चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाची प्रतिक्रिया समोर आली असून आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे गटनेते किशोर पोरजे यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आमच्या नगरसेवकांना निधी कमी दिला जातो, हे खरे आहे. प्रभागातील काही कामे सांगण्यासाठी नगरसेवक आयुक्तांकडे तक्रार करतात. मात्र, आयुक्तांकडूनही वेळीच दखल घेतली जात नाही. त्या तुलनेत सत्ताधारी नगरसेवकांना निधीही भरपूर दिले जात असून त्यांनी सांगितलेली कामे देखील वेळीच केली जात आहेत. नगरसेवकांना अधिकच्या निधीचे आमिष दाखविण्याचे काम सुरू आहे. नाशिककरांनी यांना बहुमत दिलेले असताना देखील अजून इतर नगरसेवकांची यांना आवश्यकता का? अशा परिस्थिती देखील पक्षाचा एकही नगरसेवक फुटणार नाही. उलट जो नगरसेवक असे करेल त्याचे मतदार ‘ऑपरेशन तुडवा’ केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया गटनेते किशोर पोरजे यांनी दिली.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याची प्रत्येकाची इच्छा
ठाकरेंचे नगरसेवक शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिवसैनिकांना विश्वास आहे. प्रत्येकाला वाटतंय आपण एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. विधान परिषद निवडणुकी वेळी संपर्क मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्या अनेक पक्षातील नगरसेवकांची चर्चा झाल्या. यातून तसं काही घडत असेल तर नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे प्रत्येकाला आकर्षण आहे. ५ कोटींचा निधी दिला जाणार या अफवा अशी कमिटमेंट दिलेली नाही. विकास निधी नाशिकच्या विकासासाठी दिला जाईल.’




