नाशिक | प्रतिनिधी
एखाद्या कथेलाही मागे टाकेल असा फसवणुकीचा प्रकार सातपूर परिसरातून उघडकीस आला आहे. तब्बल २८ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका व्यक्तीचा ‘बनावट अवतार’ उभा करून, म्हाडाचा निवासी गाळा स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या फसवणूक प्रकरणात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनने कारवाई करत दोन पसार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
आनंद बद्रीनाथ भट्टड (वय ६०) आणि राजेश कैलास विश्वकर्मा (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सातपूर कॉलनीतील म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील गाळा (क्र. १७८२) हा मूळ मालक रामकिशोर पुत्तूलाल तिवारी यांना १९८५ मध्ये लॉटरीद्वारे मंजूर झाला होता. आर्थिक अडचणींमुळे तिवारी यांनी त्यांचे मित्र मुखत्यारसिंग रामसिंग यांना पैसे भरण्यास सांगून घराचा ताबा दिला होता. दरम्यान, २५ मे १९९८ रोजी रामकिशोर तिवारी यांचे निधन झाले. तिवारी यांच्या निधनानंतर तब्बल १९ वर्षांनी, म्हणजेच २०१७ मध्ये आरोपींनी एक भयंकर कट रचला. रामकिशोर तिवारी हे मरण पावले असल्याचे माहित असतानाही, मुख्य संशयित प्रशांत श्रीराम बडगुजर, आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांनी संगनमत केले. त्यांनी मृत तिवारी यांच्या नावाचे आणि त्यावर एका अज्ञात बनावट व्यक्तीचा फोटो असलेले ‘बनावट मतदान ओळखपत्र’ तयार केले.
Nashik News: गोदावरीचा पूर ओसरताच रामकुंड परिसरात स्वच्छता,’इतके’ टन कचरा संकलीत
धक्कादायक बाब म्हणजे, २३ फेब्रुवारी २०१७ रोजी या टोळीने त्या बनावट व्यक्तीला थेट सहदुय्यम निबंधक नाशिक-४ यांच्या कार्यालयात रामकिशोर तिवारी म्हणून उभे केले. तिथल्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून बनावट कागदपत्रांच्या आधारे गाळा क्र. १७८२ चा हस्तांतरण दस्त संशयित प्रशांत बडगुजर याच्या नावावर नोंदवून घेतला. त्यानंतर या बनावट दस्तऐवजाचा वापर म्हाडा कार्यालयात करून गाळा हडपण्यात आला.
असा झाला पर्दाफाश
एप्रिल २०२३ मध्ये जेव्हा मुखत्यारसिंग यांच्या नातवांनी कायदेशीर हस्तांतरणासाठी मूळ मालकाचे वारसदार दीपक रामकिशोर तिवारी (वय ५२, रा. सिडको, नाशिक) यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा दीपक तिवारी यांना धक्काच बसला. कारण हा गाळा आधीच २०१७ मध्ये प्रशांत बडगुजरच्या नावावर ट्रान्सफर झाला होता. दीपक यांनी म्हाडा कार्यालयात धाव घेतली असता म्हाडाने त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, बनावट दस्तऐवज बनवले गेल्याचे स्पष्ट झाले. अखेर ५ जून २०२६ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
महिनाभराने पडल्या बेड्या
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा हे पसार होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट दोनला संशयितांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर युनिट दोनचे प्रभारी व एपीआय हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ध्रुवनगर येथे सापळा रचून आनंद बद्रीनाथ भट्टड (वय ६०, रा. मनमोहन सोसायटी, अशोकनगर, सातपूर) व राजेश कैलास विश्वकर्मा (वय ३८, रा. समतानगर, सातपूर कॉलनी यांना अटक केली.




