पारनेर । तालुका प्रतिनिधी
खासदार निलेश लंके (MP Nilesh lanke) यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सभा घेतल्या, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नगर शहरात रॅली काढली. तसेच मी सुद्धा कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) भागात सभा घेतल्या व जिल्ह्यात महाविकास आघाडीचा (MVA) धर्म पाळत निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
निलेश लंके यांच्या विजयात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकासआघाडीच्या वरीष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली. शिवसेनेला पारनेरची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळावी यासाठी मी जबाबदार नेता म्हणून आग्रही राहणार असल्याचे सांगून अंधारे यांनी पारनेरमध्ये जोरदार फटकेबाजी करुन पारनेरच्या शिवसेनेत नवचैतन्य निर्माण केले.
हे हि वाचा : महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
सुषमा अंधारे म्हणाल्या लोकसभा निवडणुकीच्या बैठकीमध्ये सांगितले गेले होते. पारनेर मधून निलेशभाऊ आता पुढे चालले आहेत आणि ते लोकसभा लढणार आहेत. ते निवडून येतील आणि पारनेरची जागा रिकामी होईल मग काय करावं… तर पारनेरच्या जागेवर मशाल पेटवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे लोक मेहनत घेऊ असा शब्द त्यावेळी निलेशभाऊ यांनी शिवसैनिकांना दिला होता, आता तो शब्द त्यांनी महाविकासआघाडीचा धर्म म्हणून पाळावा आणि मला खात्री आहे की ते सुद्धा शब्द पाळणारे आहेत.
महाविकास आघाडीच्या पक्षातील एक जबाबदार पदाधिकारी म्हणून नेता आणि प्रवक्ता म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने मी माझ्या पक्षप्रमुखांकडे विनंती करते आहे आणि मी जाहीरपणे या सभागृहातून सांगते आम्हाला पारनेरची जागा हवी आहे. शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या मेळाव्याने झाला. या मेळाव्यातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलत होत्या.
हे हि वाचा : तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर…; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धरले धारेवर
शिवसेना तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, शिवसेना वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष धनंजय निमसे, शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळुंज, युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, शिवसेना नेते भास्कर शिरोळे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंकाताई खिलारी, पारनेर युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे, शेतकरीसेना तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, बाजार समिती संचालक किसन सुपेकर, बाबासाहेब नर्हे, डॉ.पद्मजाताई पठारे, उपनगराध्यक्ष राजू शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहकले, ऍड.कृष्णा जगदाळे, ज्येष्ठ नेते पोपट चौधरी, नितीश करंदीकर, बाळासाहेब रेपाळे, संतोष येवले, संतोष साबळे, सखाराम उजगरे, पंचायत समिती सदस्या ताराबाई चौधरी, सरपंच रामदास खोसे, सरपंच सुनीताताई मुळे, सरपंच डॉ.कोमलताई भंडारी, डॉ.नीता पठारे, डी.के.पांढरे, आयुब शेख, सुभाष भोसले, बाळासाहेब भुतारे, जयसिंग धोत्रे, पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकूडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने पारनेर येथे उपस्थित होते.
तसेच यावेळी बोलताना अंधारे पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणूकीत आम्ही राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली आहे. शिवसेनेची मशाल तेवत ठेवण्यासाठी आता आम्हाला पारनेरची जागा हवी आहे. भाऊ म्हणून नीलेश लंके यांच्यासाठी मी सभा घेतल्या. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी वहिणी माझ्या वहिनी आहेत. लोकसभेला नणंद प्रचारासाठी आली तशीच आता भावजय या नात्याने शिवसेनेच्या प्रचाराला राणी वहिणी येतील असा विश्वास व्यक्त करून अंधारे म्हणाल्या पारनेरची जागा शिवसेनेला मिळाल्यावर उमेदवार कोणीही असो ती निवडूण आणायचा आहे असे आवाहन उपस्थितांना केले. विरोधकांकडे पैसा असला तरी आपल्याकडे सत्व, तत्व, अस्तित्व आहे ते अस्तित्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे अंधारे म्हणाल्या.
हे हि वाचा : ‘त्या’ नराधमाचा ‘चौरंग’ करा…; बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया
नगर जिल्ह्यात शिवसेनेची मशाल धगधगती ठेवायची असेल, तर त्यासाठी पारनेरची जागा महत्त्वाची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करणार असून, ती जागा आपण घेत आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने पारनेरची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे, यावर चर्चा झाली आहे. आता १८ सप्टेंबर रोजी जागावाटपाबाबत पुन्हा चर्चा होणार तेव्हाही पारनेरची जागा सेनेकडेच घेण्याबाबत आग्रही राहू, असा शब्द यावेळी अंधारे यांनी दिला. आता उमेदवारीची माळ पारनेरमधून कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पारनेर येथे मोठ शक्ती प्रदर्शन करत झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यामध्ये पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील जागेवर आता पारनेर शिवसेनेने दावा सांगितला आहे.
राज्यातील महायुती सरकारवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या नावाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे भासवत आहेत की, जणू काही स्वतःच्या खिशातील पैसेच ते या बहिणींना देत आहेत. जनता भरत असलेल्या कराच्या माध्यमातून मिळणारे पैसे या योजनेसाठी वापरले जात आहेत. दुसरीकडे राज्यात शेतीमालाला भाव नाही, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. दिल्ली दरबारी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणारे हे महायुती सरकार डुप्लिकेट असून, विधानसभेत यांना धडा शिकवा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले.
हे हि वाचा : गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?
पारनेरची शिवसेना खंबीर आणि अभेद्य : डॉ.श्रीकांत पठारे
गद्दारांनी घात करून शिवसेनेत फुट पडल्यानंतर पारनेर तालुका मात्र उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. संकटाच्या काळात आम्ही शिवसेना वाढवा अभियान राबविले. गद्यारांसोबत शिवसैनिक गेला नाही. तालुक्यातील शिवसेना अभेद्य राहिली. लोकसभा निवडणूकीत आम्ही नीलेश लंके यांना खंबिर साथ दिली. त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे. लोकसभा निवडणूकीत निर्णय घेण्यास वेळ लागला असला तरी उध्दव ठाकरे यांच्या फोननंतर शिवसैनिक सक्रिय झाले. नगर येथे बैठकीत शिवसेनेला पारनेर मतदारसंघ सोडण्याचा शब्द देण्यात आला असून सेनेसाठी जागा घेण्याची जबाबदारी संजय राउत यांनी घेतली आहे. श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबिरपणे उभे राहू.
पारनेर शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन…
पारनेरच्या लाल चौकात शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे पारनेर शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात ओपन जीपमधून मोठे शक्ती प्रदर्शन करत पारनेर बाजारपेठेमधून घोषणाबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे समर्थकांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहिला मिळाला. पारनेर येथे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे शक्ती प्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचवायला लावणारे ठरले. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पारनेरच्या जागेवर दावा सांगितला असल्यामुळे या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष होते.
हे हि वाचा : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड
पारनेर ही शिवसैनिकांची खाण आहे. शिवसेनेच्या नादाला कोणी लागू नका, शिवसैनिकांवर झालेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. कोणी जर आमच्यावर दादगिरी केली तर त्याच्या घरात घुसुन त्याला लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. श्रीकांत पठारे (शिवसेना तालुकाप्रमुख)