श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शहरातील वॉर्ड नं. २ परिसरातील काजीबाबा दर्गाच्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या एका जणाने बेकायदा घरामध्ये लपवून ठेवलेल्या पाच तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाबनबी अन्वर शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचासह शहरातील काजीबाबा दर्गाच्या पाठीमागे, वॉर्ड नं. २ येथे जाऊन गुलाबनबी अन्वर शेख यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बेकायदा असलेल्या आणि आजोबाच्या घरामध्ये लपवून ठेवलेल्या एकूण ३००० रुपये किंमतीच्या पाच तलवारी काढून दिल्या. पोलीसांनी तलवारी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी आरोपी विरोधात आर्म अँक्ट कलम ४, ७, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील पथकातील पोसई समाधन सोळंके, उपनिरीक्षक श्री. सुर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल साळवे, पोना. संदीप दरंदले, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी खरात, श्री. कांतखडे, श्री.पटारे, श्री. वाघमारे, शिंदे, दुकळे, गिरी, म.पो.काँ. मुसमाडे यांनी केली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन करीत आहेत.




