Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यातीन वाजेचे ‘तीन तेरा’; पोलीस प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त

तीन वाजेचे ‘तीन तेरा’; पोलीस प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाने रुग्ण संख्या कमी झाल्याने नाशिकमध्ये (Nashik) काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता दिली, मात्र त्याचा उलट परिणाम नागरिकांसह प्रशासनावर झाल्याचे दिसून येत आहे…

- Advertisement -

शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असताना सायंकाळपर्यंत बाजारात तोबा गर्दी दिसत होती. विशेष म्हणजे दुपारपर्यंत कोठेही पोलीस दिसले नाही. यामुळे आपण तिसर्‍या लाटेला आमंत्रण तर देत नाही ना, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सकाळपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेऊन दर शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) हे पॅटर्न नाशिकचेच होते. ते राज्य शासनाने (maharashtra state government) स्वीकारून राज्यात लागू केले, मात्र नाशिकमध्ये या कायद्याची आता अंमलबजावणी होताना दिसत नाही.

काल (दि.14) सकाळपासून शहरातील मुख्य बाजार असलेल्या मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, कानडे मारुती लेन, महात्मा गांधी मार्ग, शालिमार, शिवाजी रोड, सीबीएस, दुध बाजारसह गंगगाघाट आदी परिसरात लोकांनी किरकोळ साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे दुकानदारांनीदेखील शिस्तीचे पालन न करता थेट रस्त्यामध्येच अतिक्रमण करीत आपली दुकाने थाटली होती. त्यातच पोलीस (Nashik Police) प्रशासनाचे नियोजनच नसल्याने लहान मोठ्या गाड्या बाजारात आतमध्ये शिरल्या होत्या.

एकीकडे नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) स्मार्ट सिटीच्या (Smart City) माध्यमातून अनेक ठिकाणी अत्यंत संथ गतीने कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. नाशिककरांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

थेट गाडीरुन खरेदी

रसत्याच्या मधोमध अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, यामुळे काही नागरिक तर आपल्या दुचाकीवरुनच खरेदी करताना दिसले. आपल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे भानदेखील वाहन चालक व दुकानदारांना नव्हते. मागील सुमारे दीड वर्षापासून करोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. तरी नागरिक बेशिस्तीचे दर्शन देत असल्याने आता तिसर्‍या लाटेला निमंत्रण देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खड्डे कधी बुजवणार

नाशिक महापालिका स्मार्ट सिटीचा कारभार काही सुधारतांना दिसत नाही. महासभेत नगरसेवकांसह नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करुनही शहरात अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आलेले नाही.

महात्मा गांधी मार्गावर पाईप टाकायचे काम मागील दोन महिन्यांपासून कासवाच्या गतीने सुरूच आहे. त्याचप्रमाणे कानडे मारुती लेन, दहीपूल येथील कामाची गती काही वाढलेली नाही. यामुळे वाहतूक कोंडी होऊन आजारांना निमंत्रण मिळत आहे.

शहरातील अतिक्रमण व पार्किंगच्या प्रश्नाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे नाशिककरांची कुचंबना होत आहे. प्रशासकीय सेवकांचे व अतिक्रमण धारकांचे काही लागेबांधे तर नाही ना? असा संशय नाशिककर व्यक्त करीत आहेत.

तीनचे ‘तीन तेरा’

ब्रेक द चेन मोहिमेत विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. मात्र गत तीन आठवड्यांपासून शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश मिळाले आहे. मात्र आज दुपारी 3 वाजेचेच 3 तेरा झाल्याचे चित्र शहरातील बाजारेपठ भागात पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तीन वाजेनंतरही सर्रास दुकाने सुरू होती, तर साधारण चार वाजेनंतर काही प्रमाणात पोलिसांच्या गाड्यांमधून लोकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. तर सायंकाळपर्यंत दुकाने सुरूच होती.

पोलीस प्रशासन सुस्त, नागरिक त्रस्त

या परिसरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतूक कोंडी दररोजच होत असल्याचे पोलीस प्रशासनाला ठाऊक असताना याठिकाणी वाहतूक पोलीस दिसून येत नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी हेल्मेटच्या नियमांचे पालन व्हावे याकरिता “नो हेल्मेट नो पेट्रोल” (No Helmet No Petrol) ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते काय शक्कल लढवणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या