Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसामाजिक सभ्यता नियमात बांधण्याचा विषय ठरावा?

सामाजिक सभ्यता नियमात बांधण्याचा विषय ठरावा?

सार्वजनिक मालमत्तेची पळवापळवी; किमानपक्षी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान वा गैरवापर हे सामाजिक आंदोलनाचे ठळक लक्षण बनले आहे. कोणतेही नियम मोडण्यासाठीच असतात ही नवपरंपरा प्रस्थापित होऊ पाहात आहे. सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची मालमत्ता आहे याचा विसर पडला आहे. त्यामुळेच सामाजिक आंदोलन वा दंगलीत सार्वजनिक मालमत्तेलाच लक्ष केले जाते. त्या मालमत्तेचा कसाही वापर करणे, तिची जपणूक न करणे हा अलीकडच्या काळात हक्कच मानला जात आहे. विनातिकीट प्रवास करणे, एसटीतील बाकड्यांचा स्पंज फाडणे, स्वच्छतागृहे घाण करणे आणि वाट्टेल तिथे थुंकण्यात कोणाला काहीही गैर वाटत नाही हे नवेच सामाजिक दुखणे झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या काही बेमुर्वतखोराना न्यायालयाने शासन केल्याचे काहीवेळा आढळते. पण अशी प्रकरणे नमुने म्हणून सांगता यावी इतकीच. सार्वजनिक मालमत्तेतचा वापर करताना सभ्यतेचे नियम न पाळणारांवर कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वेत प्रवाशांचे गट रात्री उशिरापर्यंत अनेकदा जोरात बोलतात. मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. गाणी म्हणतात. गोंगाट करतात. असे वर्तन करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही प्रवाशाला रात्री दहा नंतर मोठ्याने बोलण्याला, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकायला यापुढे बंदी घातली गेली आहे. याविरुद्ध सहप्रवासी तक्रार करू शकतील. अशा तक्रारींचे निवारण न झाल्यास संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे. सभ्यतेचे साधे साधे नियम न पाळल्याबद्दल कारवाई करण्याची वेळ का यावी ? सामाजिक भान कुठे हरवले? इतरांना त्रास होईल अशा आवाजात कधीही बोलू नये या शिकवणीशी तरुणाई तसेच मोठ्यांनी सुद्धा फारकत कधीपासून घेतली? मोठ्यांचा आदर राखावा, त्यांना नमस्कार करावा, ओरडून बोलू नये, आरडाओरड करू नये, शिव्या देऊ नये, वेळेचे पालन, कृतज्ञता व्यक्त करणे, एकमेकांना मदत करणे, सार्वजनिक मालमत्ता ही देशाची संपत्ती आहे ही सभ्यतेची मूल्ये नियमांच्या आधारे रुजतील का? नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याचे भान देण्याचा प्रयत्न नागरिक शास्त्राच्या माधमातून केला जातो. त्या विषयाचे महत्व परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित झाले आहे हे दुर्दैव. कुठेही कसेही वागणे योग्य नाही हे कोण कोणाला सांगणार? सामाजिक बंधुत्वाची भावना हरपत चालली आहे. परिणामी माणूस स्वकेंद्री होत आहे. मी आणि माझे अशी विचारसरणी रुजत आहे. बहुसंख्यांमध्ये समाजासाठी नव्हे तर स्वतःसाठी जगण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे सामाजिक वर्तनही बदलते आहे. त्याचा वेग इतका आहे ही त्या बदलण्यात गैर आहे याची जाणीवही होत नाही. बदल हा काळाचा स्थायीभाव आहे. ते बदल कसे व्हावेत हे माणसांच्या विचारांवर अवलंबून आहे. पण त्याबाबतीतही सध्या ध्रुवीकरण सुरू आहे. सामाजिक सभ्यतेची पाळेमुळे उखडून टाकण्याचे प्रयत्न नेतेमंडळींकडून जाणीवपूर्वक सुरु असावेत का? नेते सांगतील वा करतील ते ते सर्व सामाजिक वर्तनाचे आदर्श मानलेच जाणार! ‘समर्थ जे जे आचरति; तया नामधर्म म्हणती’ हे तर संत वचनच आहे. साध्या सभ्यतेचा अधिक्षेप टाळावा म्हणून नियमांचे कुंपण घालावे लागावे हे भारतीय समाजाच्या सनातन श्रेष्ठतेच्या ठिसूळपणावर प्रकाश टाकते. संस्कृती असो की संस्कार यात कालसापेक्ष बदल होत असतात. योग्य बदल योग्य पद्धतीने स्वीकारणाचे आव्हान आमच्या सनातनी बाण्याला पेलवेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या