मुंबई | Mumbai
भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर गंभीर दुखापत झाली होती. तो सध्या अतिदक्षता विभागात (ICU) आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान झालेल्या बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे.
शनिवारी (२५ ऑक्टोबर) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत असलेल्या अॅलेक्स कॅरीचा शानदार कॅच घेतला. या कॅचदरम्यान त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. तो ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे आढळले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे, पण भारतात परतण्यापूर्वी त्याला किमान एक आठवडा रुग्णालयात राहावे लागणार आहे.
ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर, अय्यरच्या शरीराचे तापमान, नाडीचा वेग आणि रक्तदाबात चढ-उतार होत होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. टीम डॉक्टर आणि फिजिओने कोणतीही जोखीम पत्करली नाही. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तो आता स्थिर आहे, परंतु हे प्राणघातक ठरू शकले असते. त्याची प्रकृती आता सुधारतेय. तो मजबूत आहे आणि लवकरच बरा होईल असे टीम कडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत. वृत्तानुसार, श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे संसर्ग होण्याची भीती असल्याने अय्यरला आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या ४८ तासात त्याचा रक्तस्त्राव नाही थांबला तर अजून काही दिवस त्याला आयसीयुमध्येच ठेवण्यात येईल. त्याच्या रुग्णालयात राहण्याचा कालावधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यावर अवलंबून असेल. श्रेयस सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहील अशी अपेक्षा आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




