पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या जयघोषात शुक्रवारी रात्री ९ नंतर होळी पारंपरिक पद्धतीने गडावर पेटली. १५ दिवस अगोदरच होळी साजरी करणारे मढी हे देशातील एकमेव ठिकाण आहे. येथील पौर्णिमेच्या होळीचा मान गोपाळ समाजाला असून त्या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळी साजरी करत नाहीत.
दरम्यान, मुस्लिम व्यावसायिकांना मढीमध्ये व्यवसाय बंदीच्या ग्रामसभेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काल पेटलेल्या होळीच्या वेळी नगरचे आमदार संग्राम जगतापांसह अनेक हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आरती होणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. याठिकाणी होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा भरते. शुक्रवारी कानिफनाथांची आरती झाल्यानंतर होळीची भट्टीची पूजा करून देवस्थानचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या हस्ते रात्री ९ नंतर होळी पेटवण्यात आली. यावेळी भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, वैशाली नागवडे, माजी सरपंच भगवान मरकड, डॉ. रमांकात मडकर, विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
मढीच्या होळी सणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या दहा दिवस अगोदरच कानिफनाथांचे नाव घेत गावातून महिलांकडून तयार केल्या जातात. तसेच घरोघरी जमा केलेल्या गोवऱ्या वाजतगाजत गडावर आणण्यात येतात. त्यानंतर सुर्यास्तापुर्वी होळीची भट्टी रचण्यात आली. यावर्षी सर्वाधिक गोऱ्या जमा झाल्याने मोठी होळी रचण्यात आली. साधारण दहा फुट उंच व ५० बाय ५० फुट अशा आकारापर्यत भट्टी रचली गेली. दरम्यान, सकाळपासूनच मढीच्या गडावर भत्तांची गर्दी तर घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला.
होळी भोवती आकर्षक रांगोळी व फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. याठिकाणी ग्रामस्थांना होळी रचण्याचा मान असून या ठिकाणी भाविकांना देवस्थान समीतीकडून डाळ व गुळ दिला जातो. होळी पेटल्यानंतर धगधगत्या होळीला प्रदक्षिणा घालत देवाला कौल लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी झाली होती. भट्टी पेटल्यानंतर भाविकांनी प्रदक्षिणा घालून नाथांच्या भट्टीमध्ये नारळ अर्पण केला.
नगरा, शंखाचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोष दिवसभर कानिफनाथ गडावर सुरु होता. मढी येथील बाहेरगावी असलेले ग्रामस्थ होळीच्या दिवशी आवर्जून गावात येथे येतात. नाथ संप्रदायमध्ये भस्म प्रसादाला (अंगारा) विशेष महत्व आहे. वर्षभर येणाऱ्या भाविकांना भट्टीची राख प्रसाद म्हणून दिला जाते. १३ मार्चला मानाची होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला असल्याने गोपाळ बांधवाच्या उत्साहात मढीचे ग्रामस्थ सहभागी होतात.
रंगपंचमीला नाथांचा समाधीदिन असून या दिवशी लाखो भाविक मढीमध्ये येतात. मढी येथील होळी पेटून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावर्षी मढी ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेमध्ये मुस्लिम व्यवसायिकांना दुकाने थाटण्यावर मज्जाव केला आहे. या पार्श्वभूमीवर भोसले आणि आ. जगताप यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केलं आहे. मढी देवस्थान आजची होळी नसून देवस्थान मुक्ती संग्रामाची सुरुवात असल्याचे सांगत देवस्थानच्या भोवती झालेल्या अतिक्रमणावरचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे. देवस्थानी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत करतो आ. जगताप आणि भोसले यांनी यावेळी सांगितले.
मढी देवस्थान यात्रेबाबत प्रश्ना उपस्थित होऊन, मढी देवस्थान व ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा स्वागताहार्य आहे. त्याचे देशभरातून समर्थन होत आहे. मढीची होळी ही देशात सर्वात मोठी आणि वेगळी परंपरा असलेली आहे. मढी देवस्थानला हिंदू संस्कृती आणि परंपरा लाभले आहे. आज (शनिवारी) होणारी महाआरती व धर्म मेळाव्यात भूमिका जाहीर करू.
– आ. संगाम जगताप, नगर
मुस्लिम समाजाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
मढी ग्रामपंचायतमध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी घरकुल यादीचे प्रमाणपत्र वाटपासाठी दवंडी देऊन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. घरकुलाचा विषय संपल्यावर ग्रामसभा संपली असे जाहीर केले. परंतू सरपंच व ग्रामसेवकांनी गावकऱ्यांना कल्पना न देता मुस्लिम समाजाच्या विरोधात बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी मुस्लिम समाज अवैद्य व्यवसाय करतात, प्रथा पाळत नाही, असा चुकीचा उल्लेख करत ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतला. यामुळे मुस्लिम समाजामध्ये भितीचे वातावरण असून आम्हाला संरक्षण मिळावे, अशी मागणी मढीच्या मुस्लिम बांधवांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.