ऑनलाईनमुळे ‘देशदूत’ आमच्या घरात !
दैनिक ‘देशदूत’ वृत्तपत्र ऑनलाईन व सोशल मीडियामुळे आमच्यापर्यंत पोहोचते. बातम्यांची कात्रणे काढून आम्ही त्याचे प्रदर्शन भरवतो. मराठी भाषा व गावातील बातम्या वाचायला मिळत असल्याने अनेक जण आमच्याकडे आनंद व्यक्त करतात.
– शास्त्री भक्तिस्वरूपदास, अमेरिका
फैजपूर । अरुण होले
अमेरिकेत नुकतेच दैनिक ‘देशदूत’मधील बातम्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. अमेरिकेतील श्री स्वामिनारायण मंदिर पेलेटाईन-शिकागो संस्थेतर्फे आयोजित या प्रदर्शनास अमेरिकेतील मराठीच नव्हे तर भारतीय भाषिक वाचकांनीही भेट दिली. आपल्या भागातील बातम्या देणारे ‘देशदूत’ अग्रेसर दैनिक असल्यामुळे ऑनलाईन आवृत्तीही वाचत असल्याचे अनेकांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचा प्रभाव 18व्या शतकात अमेरिकेसारख्या देशात निर्माण केला. त्यानुसारच भारताच्या संपन्न संस्कृतीचा परिचय साता समुद्रापलीकडे व्हावा, या हेतूने दैनिक ‘देशदूत’मध्ये आलेल्या विविध बातम्यांचे प्रदर्शन अमेरिकेत नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनाला अमेरिकेत भारतीय व अमेरिकन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनादरम्यान इतर भाषिकांनी ‘देशदूत’चा अर्थ आयोजकांना विचारला. गावागावांतील बातम्या आम्हाला ‘देशदूत’मध्येच वाचायला मिळत असल्याचे अनेकांनी प्रदर्शनात सांगत; अशा प्रदर्शनाचे नियमित आयोजन करावे, असे सांगितले.
प्रदर्शनासाठी श्री स्वामिनारायण मंदिराचे अध्यक्ष अर्जुनभाई, स.गु.शास्त्री धर्मप्रसाददासजी व स.गु.शास्त्री भक्तिप्रकाशदासजी, स्वामी अनंतप्रकाशदासजी, शास्त्री स्वयंप्रकाशदासजी आणि प.पू.शास्त्री मुक्तप्रकाशदासजी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी राजेश परीख, वेदांत पटेल, योगेश भाई, शिरीष भाई, अश्विन भाई, स्नेहलभाई पीठडीया यांचे परिश्रम लाभले.