शिवाजी साळुंके | श्रीगोंदा | Shrigonda
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दोन सहकारी कारखानदार आणि तिसरे नवखे तरूण नेते यांच्यात लढत होत आहे. या लढतीला चौकोनी करणार्या वंचितच्या उमेदवारीचा झटका कुणाला बसणार यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. तालुक्यात नागवडे, पाचपुते, जगताप हेच परंपरागत राजकीय घराणे रिंगणात असले तरी यंदा वंचितच्या तिकीटावर आण्णासाहेब शेलार लढत आहेत. तिघात प्रमुखांमध्ये चौथा भिडू आणि बाकी छोट्या-मोठ्या पक्षांचे तर काही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कोण कोणाचे मत कापणार, याची चर्चा आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कायम चुरशीची निवडणूक होत आलेली आहे. मतदारसंघ सर्वसाधारण खुला झाल्यानंतर कै. शिवाजीराव नागवडे हे आमदार झाले. यानंतर बबनराव पाचपुते आमदार झाले होते. या दोघांचीच लढत अनेक पंचवार्षिक निवडणुकीत दिसून आली. तालुक्याचे राजकारण नागवडे-पाचपुते यांच्या भोवती कायम फिरत राहिले. याला छेद देण्यासाठी घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, कै. कुंडलिकराव जगताप यांनी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. नागवडे, पाचपुते यांच्याभोवती फिरणार्या राजकारणात आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, दत्तात्रय पानसरे आदी दुसर्या फळीतील कार्यकर्ते कधी पाचपुते तर कधी नागवडेंसोबत राहिले. यात घनश्याम शेलार यांनी आपले जनमत वाढवत ठेवले. मात्र, या पक्षातून त्या पक्षात स्थलांतरित होण्याच्या सवयीमुळे त्यांना आलेली संधी अनेक वेळा गमवावी लागली.
2014 साली पहिल्यांदाच बबनराव पाचपुते विरोधात नागवडे, जगताप एकत्र आले. त्यांना उर्वरित पाचपुते विरोधकांनी साथ दिली आणि पहिल्यांदा राहुल जगताप यांच्या रूपाने तरुण आमदार श्रीगोंदा मतदारसंघाला मिळाला. पण 2019 येता येता जगताप यांच्या कारखानदारीतील अडचणी समोर आल्यामुळे त्यांनी 2019 ची निवडणूक लढवली नाही. पाचपुतें विरोधात घनश्याम शेलार उमेदवार होते. यात शेलार यांना शरद पवारांच्या लाटेने चांगलीच साथ दिली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. पाचपुते विजयी झाले. यावेळी नागवडे यांनी पाचपुते यांना साथ दिली. तरीही पाचपुते यांना मोठा विजय मिळवता आला नाही. 2024 मध्ये मात्र नागवडे, पाचपुते आणि जगताप हे तीनही उमेदवार आमने-सामने आहेत.
सुरूवातीला भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. म्हणून अनुराधा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याची साथ सोडून शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली. नंतर भाजपचे तिकीट विक्रम पाचपुते यांच्याकडे आले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तिकीट राहुल जगताप यांना दिले जाणार, असा अंदाज असताना राजकीय खेळीत मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार यांच्याऐवजी ठाकरे गटाकडे दिला. नागवडे यांनी ठाकरे सेना गटात प्रवेश करत थेट महाविकास आघाडीचे तिकीट पटकावले. जगताप यांच्यासमोर कोणताच पर्याय उरला नसल्याने त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली. पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगत राहुल जगताप अपक्ष लढत आहेत. दरम्यान, भाजपने ऐनवेळी प्रतिभा पाचपुतेेंऐवजी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी दिली. यामुळ तालुक्यात साखर कारखानदारांच्या अस्तित्वाची आणि भवितव्याची निवडणूक आहे.