श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी बांधकामासाठी लागणारी वाळूतस्करी राज्यभर बंद केली असून, श्रीगोंदा तालुक्यात मात्र घोड आणि भिमा नदी पात्रातून जेसीबी पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस अनधिकृतपणे वाळू उपसा करून दररोज हजारो ब्रास वाळू चोरीला जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.याकडे महसूल प्रशासन मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी पात्रातील राजापूर, माठ, खामकरवाडी, माळवाडी तर भिमा नदी पात्रातील पेडगाव, आर्वी, अजनुज येथून अनधिकृतपणे वाळूतस्कर जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने तसेच फायबर बोटीच्या मदतीने रात्रंदिवस वाळू उपसा करून ट्रॅक्टर, ट्रक, हायवा यांच्या साह्याने वाहतूक करीत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील वाळूला पुणे जिल्ह्यात जास्त मागणी असल्याने व बाजारभावही दुप्पट मिळत असल्याने जास्त प्रमाणात पुणे जिल्ह्यात विक्रीला जाते तर तालुक्यात शासनाचा वाळू डेपो नसल्याने ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने नाईलाजास्तव अव्वाच्या सव्वा भावाने वाळू विकत घ्यावी लागत आहे. यामुळे तालुक्यात तुम भी चूप और हम भी चूप अशी अवस्था झाली आहे. याबाबत महसूल विभागही काही बोलत नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी ठरवलेल्या धोरणानुसार अवैध वाळू व्यवसायाला व त्यातून घडणार्या गुन्हेगारीला आळा बसवण्याऐवजी खुलेआम ‘आम्ही तर आहोत वाळू तस्कर आमची द्या कोणालाही खबर’ या आविर्भावात तालुक्यात घोड व भिमा नदी पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा आणि चढ्या भावात विक्री होत आहे.
सध्या होणार्या पावसामुळे शासनाच्या नियमानुसार जून महिन्यात नदीवरील सर्व बंधार्यांमधून पाणी सोडले जात आहे. बंधार्यांचे दरवाजे काढण्याचे काम जोरात सुरू आहे. परिणामी नदी पात्रात पाण्याखाली बुडालेेली वाळू चोरी करणार्यांना सहज उपलब्ध होत आहे. यामुळे नेहमी वाळू चाोरणारे व स्थानिक लोकही ही वाळू घेऊन जात आहेत. तर काहीजण याची विक्री करत आहेत. याबाबत त्या गावातील नदी पात्राची चाळण झाली असून, यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. महसूलचे जिल्हा खणी कर्म अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, गावकामगार तलाठी हे याबाबत गप्प का आहेत? असा प्रश्न निर्माण झाला असून कारवाईची मागणी होत आहे.