Friday, November 22, 2024
Homeनगरश्रीगोंद्यात पक्ष संघटनेत मूळ भाजप ‘साईड लाईन’

श्रीगोंद्यात पक्ष संघटनेत मूळ भाजप ‘साईड लाईन’

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुका राजकीय संवेदनशील आहे. याठिकाणी भाजपचे मूळचे नेतृत्व उदयाला येताना त्याला दाबण्याचाच प्रयत्न 40 वर्षे झाला. यामुळे पक्षात जो बाहेरून येतो, त्याच्याच ताब्यात पक्षाचे सूत्र जात असल्याने सध्याही भाजपमधील अनेक अनुभवी, विचारसंपन्न नेते, प्रमुख मंडळी साईडलाईन दिसत आहेत. यामुळे पक्ष ज्यांच्या ताब्यात त्यांची हाजीहाजी करणारे, समर्थकांची वर्णी पक्ष संघटनेत करण्यात आलेली आहे. यामुळे तालुक्यात भाजपच्या अनेक जुन्या, पक्षासाठी खस्ता खाल्लेले नेते, कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे. यामुळेच तालुक्यात लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली होती.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील भाजपची 1980 च्या दशकात सुरुवात झाली. फारशी ताकत नसताना तत्कालीन नेत्यांनी भाजप वाढवायला सुरुवात केली. मधल्या काळात माजी सभापती बापूसाहेब जामदार यांनी काही काळ नेतृत्व केले. त्यानंतर घनश्याम शेलार, दत्तात्रय हिरणवाळे, प्रफुल्ल मेहता, कै. आप्पासाहेब गाडेकर यांच्यासह राजेंद्र म्हस्के, संतोष लगड, आबा नागवडे, सुनील अनभुले आदींनी अडचणीच्या काळात संघटना मजबूत ठेवली. त्यानंतर देशातील आणि राज्यात पक्षाची सत्ता येत असताना शेलार यांनी भाजप सोडली. यामुळे तालुक्यात भाजपमध्ये आयराम, गयाराम याची भरती सुरू झाली. बाहेरून जो नेता भाजपमध्ये प्रवेश करतो त्याचीच पकड पक्षात वाढली. दरम्यान पक्षात आलेले नेते पक्ष सोडून गेले, त्याचसोबत त्याच्या समर्थकांनी पक्षाला बायबाय केला.

तालुक्यातील जगताप, नागवडें सारख्या मोठे नाव असलेले नेते भाजपमध्ये आले आणि परत सोडून गेले. सध्या आ. बबनराव पाचपुते पक्षात सक्रिय आहेत. त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सुवर्णाताई पाचपुते देखील पक्षाचा झेंडा उंचावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. विद्यामान परिस्थितीत तालुक्यात बोटावर मोजता येतील एवढेच मूळ भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या व्यासपिठावर संधी असून बाकीचे साईडलाईन करण्यात आल्याचे दिसत आहेत. भाजपमध्ये सध्या जुने कार्यकर्ते यांना निर्णय प्रक्रियेत फारसे विचारात घेतले जात नसल्याचा फटका झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसला. महायुती उमेदवारला तालुक्यातून लीड घेता आले नाही.

परिणामी भाजपच्या पराभवात श्रीगोंदा तालुक्याचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले. पक्षाचे नगरचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात तालुक्यातील नाराज नेते, कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फारसा प्रतिसाद पक्ष ताब्यात असलेल्या नेत्यांकडून मिळाला नाही. परिणामी भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले. आताही तालुक्यात मूळचे भाजपचे असलेल्या एकही जुन्या कार्यकर्त्याला निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीत दिसून आले. विद्यमान नेत्यांच्या समर्थकांचा पक्षात भरणा करण्यात आला असून यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडण्यात आले असल्याची खंत पक्षाचे जुने निष्ठावान दत्तात्रय हिरणवाळे यांनी व्यक्त केली.

प्राध्यापक, कर्मचार्‍यांच्या हाती मतदार याद्या
सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात संघटनात्मक पदे वाटली असली तरी कुणी खाली ग्राऊंडवर काम करत नसल्याने आपल्या शिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापकापासून शिपायांपर्यंत सर्वांच्या हातात त्या-त्या गावची मतदारयादी घेऊन दारोदार जाऊन माहिती गोळा करायला लावण्यात आली आहे.

पक्षाचे कमी, नेत्यांचे समर्थक जास्त
भाजप विचारधारा असलेला पक्ष म्हणून ओळखला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, श्रीगोंद्यात पक्षाचे ध्येयधोरण कमी आणि आपल्या नेत्यांची आणि नेत्याच्या सुपुत्रांचे समर्थन यांचाच बोलबाला असल्याने जोपर्यंत नेते पक्षात आहेत. तोपर्यंतच त्याचा गोतावळा पक्षात असल्याची प्रतिक्रियाही जुन्या भाजपच्या नेत्यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या