श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी वैभव आसाराम खंडके (वय 27, रा. टाकळी लोणार,ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 1 जानेवारी 2026 पासून खंडके यांना अज्ञात इसम व्हॉट्सपद्वारे संदेश पाठवून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. फिर्यादीने संपूर्ण रक्कम न देता 1 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र उर्वरित रक्कम न दिल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मेसेज करीत तू आमची फसवणूक केली आहे, तू जर खंडणीचे सगळे पैसे दिले नाही तर तुझी खाजगी छायाचित्रे व्हायरल करून ‘तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही दिसतील तिथे जीवे ठार मारून टाकीन’, अशी धमकी दिली.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यांनतर तपासासाठी दोन विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता संबंधित मोबाईल क्रमांकधारकाचे नाव आकाश पोपट मोरे (वय 24, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा) असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार आरोपी आकाशसह बापू विठ्ठल शिंदे (वय 31), किरण विठ्ठल शिंदे (वय 29, दोघे रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) यांना दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली. आरोपींना मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, श्रीगोंदा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 20 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन व तीन चारचाकी वाहने असा एकूण 54 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी व वाहने निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गहिनीनाथ यादव, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, मयुर तोरडमल तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु व नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे करत आहेत.




