Saturday, July 27, 2024
Homeनगरसंबंधित आडत्यांना नोटिसा, गुन्हे दाखल होण्याची शक्यता

संबंधित आडत्यांना नोटिसा, गुन्हे दाखल होण्याची शक्यता

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या खरीप कांदा अनुदानात घोटाळा केल्याप्रकरणाच्या चौकशी नंतर संबंधित कांदा आडत व्यापार्‍यांना चौकशी समितीच्यावतीने जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी नोटीस बजावली आहे. या व्यापार्‍यांनी समाधानकारक प्रतिसाद न दिल्यास संबंधित व्यापार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आली असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये विक्री केलेल्या कांदा व शासन अनुदान प्रस्तावाबाबत टिळक भोस यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक यांच्याकडून चौकशी समिती नेमली होती. ही चौकशी समिती मागील काही दिवसांपासून चौकशी करत आहे. दरम्यान या मे. हावलदार ट्रेडिंग कंपनी, राज ट्रेडर्स, सत्यम ट्रेडर्स या आडत्यांना नोटिसा देऊन चौकशी समितीने प्रत्यक्ष जबाब आणि म्हणणे मागितले आहे.

शासनाने कांदा विक्रीस कमी भाव मिळालेला असल्याने फेब्रुवारी व मार्च 2023 या दोन महिन्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. या कालावधीत श्रीगोंदा बाजार समितीमध्ये संबंधित तीन आडत व्यापारी याच्याकडील कांदा विक्रीचेे अनुदान मागणी अर्ज सादर केलेले होतेे. चौकशी समितीने श्रीगोंदा बाजार समितीचे व संबंधित व्यापारी यांच्या दप्तराची तपासणी केली असता यात या व्यापार्‍यांनी संगनमताने बोगस व फेक रेकॉर्ड तयार करून अनुदान लाटण्यासाठी समितीची व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले असल्याने. त्यांना गुरूवारी (दि.26) सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा येथे लेखी म्हणणे तथा जबाब सक्षम पुराव्यासह सादर करावे, अशा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. लेखी जबाब सादर केले नाही वा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास कांदा अनुदान प्रकरणी शासनाची फसवणूक करून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध होत असल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

चौकशीत आढळली मोठी तफावत

संबंधित आडतीमध्ये प्रत्यक्ष इतका कांदा विक्री केलेली नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर कांदा पिकाची नोंदच नाही. अथवा नोंद कमी क्षेत्राची असून जादा कांदा विक्रीची हिशोब पट्टी आहे. तसेच मापाडी यांची काटा पट्टी , मापाडी रजिस्टर व व्यापार्‍यांची सौदा पट्टी यामधील वजनामध्ये तफावती आहेत. व्यापार्‍यांनी खरेदी केलेला कांदा कोठे पाठविला याबाबतची बिल्टी व सदरचा माल बाजार समितीच्या गेटमधून बाहेर जातानाचे गेट पास याबाबतची माहिती नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या