श्रीरामपूर । Shrirampur
हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येनंतर शहरातील वातावरण अधिकच तापले असून, या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसर्या दिवशीही शहरासह तालुक्यातील अनेक भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेले आमदार हेमंत ओगले यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीसाठी कथित बेग टोळी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
महात्मा गांधी चौकात झालेल्या आंदोलनात आमदार हेमंत ओगले यांच्यासह नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिंदे सेनेचे प्रकाश चित्ते, नगरसेविका वैशाली चव्हाण, माजी नगरसेवक रवी पाटील, राजेश अलघ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व शहरातील व्यापारी उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना आमदार ओगले यांनी पोलीस प्रशासनावरही तीव्र टीका केली. शहरात कार्यरत असलेल्या कथित गुन्हेगारी टोळीबाबत प्रशासनाला संपूर्ण माहिती असूनही, प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात व्यापारी, डॉक्टर, लहान व्यावसायिक, महिला आणि तरुणींना त्रास दिला जात असल्याचा दावा करत, ड्रग्ज, गुंगीच्या गोळ्या, अवैध वाळू व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे ते म्हणाले. आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, या बेग टोळीचा जो कोणी मुख्य म्होरक्या (आका) असेल, मग तो इथे असो वा बाहेर, त्या सगळ्यांवर तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
नगराध्यक्ष करण ससाणे यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत, पूर्वी कायद्यापुढे सर्व समान होते. मात्र, आता पोलिसांवर राजकीय दबाव वाढल्याने त्यांचे स्वातंत्र्य कमी झाल्याचा आरोप केला. पोलिसांना स्वतंत्रपणे काम करू दिल्यास अल्पावधीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश चित्ते यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाचा उल्लेख करत, समाजाचे संरक्षण करण्याऐवजी गुन्हेगारांचे फोफावणे चिंताजनक असल्याचे म्हटले. अलीकडील काळात मुली बेपत्ता होणे, ड्रग्ज प्रकरणे उघडकीस येणे अशा घटनांमध्ये प्रभावी तपास न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपच्या गटनेत्या वैशाली चव्हाण यांनी शहरातील हत्या, हाफ मर्डर, घरफोड्या आणि महिलांविरुद्धच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा उल्लेख करत कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रशासनाला लक्ष्य केले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूरच्या शांतताप्रिय परंपरेचा उल्लेख करत, वाढत्या गुंडगिरीमागे प्रशासनाची निष्क्रियता आणि गुन्हेगारांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण कारणीभूत असल्याचा आरोप केला. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहज पैसा कमावण्याच्या प्रवृत्तीमुळे काही तरुण गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. श्रीरामपूरची शांततेची ओळख टिकवण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी कायम ठेवत, बंदमुळे सर्वसामान्य नागरिक आणि रोजंदारीवर काम करणार्या घटकांना त्रास होत असल्याने आंदोलनाची दिशा बदलण्याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.
आजही श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याचा निर्धार, उद्या मोर्चा
येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी यापूर्वी पोलीस ठाण्यात आंदोलन केले होते. कालही यासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक पार पडली, त्यामध्ये आज मंगळवार दि. 14 रोजी शहर बंद ठेऊन उद्या बुधवार दि. 15 रोजी हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय व व्यापार्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.




