श्रीरामपूर | Shrirampur
येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने 14 कोटी 50 लाख 59 हजार 840 रुपये एवढ्या मोठ्या रकमेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. श्रीरामपूर येथील बस स्थानक व आगार खूप जुने असल्याने बस स्थानकाची दुरवस्था झाली होती. म्हणून बस स्थानक व आगाराची पुनर्बांधणी करावी अशी मागणी आ. कानडे यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परिवहन मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आवश्यक तो पत्रव्यवहारही केला होता. याबाबत विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केला होता.
त्यास अखेर यश आले. राज्य शासनाने काल बस स्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी 14 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागातील श्रीरामपूर बसस्थानक व आगाराची पुनर्बाधणी करण्यासंदर्भात काल शासन निर्णय जारी करण्यात आला. या खर्चातून नवीन बसस्थानकात 13 फलाट, वाहनतळाचे काँक्रीटीकरण व आगार कार्यशाळेमध्ये 4 गाळे व 1 यु पिट, 1 लॉगपिट, प्रशासकीय इमारत, आगार व्यवस्थापक निवास स्थान, टायर रूम, ऑइल रुम, आगार व्यवस्थापक कॅबीन, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक कॅबिन, भांडार शाखा इ. विकासात्मक कामे केली जाणार आहेत.
श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टीने येथे सर्व शासकीय कार्यालय व इतर सुविधा सुविधा आहेत. केवळ बस स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची मोठी अडचण होत होती. आता राज्य शासनाच्या या निर्णयामुळे येथील बस स्थानक व आगार अद्यावत होणार असून यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. आ. कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे बस स्थानकाच्या पुनर्बांधणीस मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याबद्दल प्रवासी व नागरिकांनी आ. कानडे व शासनास धन्यवाद दिले आहेत.