Friday, January 23, 2026
HomeनगरShrirampur : गोळीबाराच्या घटनेत बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

Shrirampur : गोळीबाराच्या घटनेत बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

गोळीबारात झाले होते गंभीर जखमी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील हाजी बंटी जहागिरदार (वय 53) यांची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना कॉलेज रोडवर घडली. काल दुपारी अडीच वाजता कब्रस्तानातील एक अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे घरी परतत असताना, सेंटलुक हॉस्पिटलच्या अलीकडच्या गेट समोर, दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ साखर कामगार हॉस्पिटल येथे प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर नगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी यांच्या मोटारसायकलवर मागे बसून घरी परतत असताना, संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेटजवळ ते आले असता, आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला. दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडी वरून उतरले. त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर अशा सहा गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. एक गोळी छातीत गेल्याने ते खाली कोसळले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

YouTube video player

बंटी जहागिरदार यांना उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉ.जगधने व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. परंतू, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगरला हलवण्यात आले तेथे एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक मुजफ्फर शेख, अंजूम शेख, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी तातडीने धाव घेतली. गोळीबाराची घटना वार्‍यासारखी शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला. लोकांच्या संतप्त भावना पाहता तातडीने पोलीस प्रशासन हॉस्पीटलमध्ये दाखल झाले. पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी दाखल होत, परिस्थिती आटोक्यात आणली.

अर्ध्या तासाच्या प्रथमोपचारानंतर बंटी जहागीरदार यांना कार्डियाक व्हॅनमधून अहिल्यानगरला हलवण्यात आले. त्यानंतर कामगार हॉस्पिटल मधील जमाव कमी झाला. दुसरीकडे सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकात सुद्धा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. वॉर्ड नं 2 परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपले दुकाने पूर्णपणे बंद केली होती. हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान श्रीरामपूर शहरात झालेल्या या थरारक घटनेमुळे सर्वत्र भीतीयुक्त वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बंटी जहागीरदार यांचे छत्रपती संभाजीनगर येथे शवविछेदन झाल्यानंतर आज त्यांच्यावर श्रीरामपुरात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस निरिक्षक नितीन देशमुख आदींनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पथकानेही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

शहराला पोलीस छावणीचे स्वरुप
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने जास्तीची पोलीस कुमक मागविली. शहराच्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वेर्स्टन चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

श्रीरामपुरात तणावपूर्ण स्थिती
शहरातील घडलेल्या या गोळीबाराचे गांभीर्य फार मोठे आहे. गोळीबाराची चर्चा शहरात पसरताच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुणे बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याचा आरोप
असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार (वय 53, रा- वॉर्ड नं.2) हा जंगली महाराज रोड, पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याच्यावर एटीएस काळाचौकी पो.स्टे. मुंबई गु.र.नं. 9/2012, भादंवि कलम 307, 427, 120 (व), स्फोटक पदार्थ कायदा कलम 3, 4, 5, आर्म अ‍ॅक्ट 3/ 25, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा कलम 10, 13, 16, 18, मोक्का कायदा कलम 3 (1) (2), 3(2), 3(4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्याला दि.10 जानेवारी 2023 रोजी जामिन मंजूर झालेला होता.
– सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधिक्षक

अफवांवर विश्वास ठेऊ नये
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच टिम तयार करण्यात आल्या आहेत. ते आरोपींचा शोध घेत आहेत. त्यामुळे लवकरच आरोपी पकडले जातील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, सामाजिक शांतता भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
– सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधिक्षक

सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद
कॉलेज रोडवरील सेंट लूक हॉस्पीटलच्या ओपीडीच्या गेटसमोर हल्लेखोरांनी हाजी बंटी जहागिरदार यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हल्लेखोरांचे चित्रण एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असल्याचे समजते, त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्या सहाय्याने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...