श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला 45 हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. याबाबत माहीती अशी की, तक्रारदार यांची पत्नी सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे उप-शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या पत्नीची सन 2015 ते 2022 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम 1 लाख 62 हजार 367 रुपये मिळाली. तक्रारदार यांच्या पत्नीस वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नंदलाल पवार (वय 53) यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने काल दि. 12 जून रोजी सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे संगीता पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50 हजार रुपयाची लाच मागणी करुन तडजोडीअंती 45 हजार रुपयाची लाच मागितली. ठरलेल्यानुसार शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह, श्रीरामपूर येथे लोकसेविका पवार यांच्याविरुद्ध सापळा लावण्यात आला. दरम्यान पवार यांनी यातील तक्रारदाराकडून पंचासमक्ष 45 हजाराची लाचेची रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, किशोर लाड, वैशाली शिंदे, चालक हरूण शेख यांनी पार पाडली.