श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न समितीमधील विखे गटाच्या सात संचालकांसह नऊ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांच्याकडे काल दुपारी सुपूर्द केले. त्यातच बाजार समितीचे संचालक जितेंद्र गदिया यांनाही अपात्र ठरविण्यात आल्याने सभापतिपद कोरम अभावी अल्पमतामध्ये गेल्याने सभापती सुधीर नवले यांचे पद धोक्यात आले आहे. बाजार समिती सभापती पदाच्या निवडीपासून हे राजकारण सुरू होते. हा माजी खा. डॉ. सुजय विखे यांचा मास्टर स्ट्रोक समजला जातो.
काल दुपारी विखे गटाचे सात, माजी आ. भानुदास मुरकुटे गट व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाचा प्रत्येकी एक अशा एकूण नऊ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्या दालनामध्ये जावून आपले राजीनामे सुपुर्द केले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले उपस्थित होते. श्रीरामपूर बाजार समितीच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी विखे गटाचे सभापतीपद ससाणे-मुरकुटे गटाकडे केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी विखे गटाचे फुटीरवादी संचालक जितेंद्र गदिया यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर काल अचानक विखे गटाच्या उपसभापतीसह सात संचालकांनी राजीनामे दिलेे. त्यांना सत्ताधारी दोन संचालक जावून मिळाल्याने राजीनामे देणारानची संख्या नऊ झाली आहे.
श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक 2023 मध्ये झाली होती. त्यावेळी कधी न होणारी विखे-ससाणे-मुरकुटे गटाची युती होऊन निवडणूक लढविण्यात आली. त्यांच्या विरोधात माजी आमदार लहू कानडे गट, राष्ट्रवादीचे अविनाश अधिक गट व शेतकरी संघटना यांनी निवडणूक लढवली. त्यात ससाणे-मुरकुटे-विखे गटाचा विजय होऊन त्यांचे 18 संचालक निवडून आले. सभापती पदासाठी विखे यांनी पुढाकार घेत त्यांचे कट्टर समर्थक गिरीधर आसने यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी एकत्रित येत विखे यांना शह दिला. त्यातच विखे गटाच्या जितेंद्र गदिया या संचालकानेही सभापती निवडणुकीच्या वेळेस विरोधात मतदान केले.
मुरकुटे गटाचे सर्व चार संचालक त्यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे विखे गट व ससाणे-मुरकुटे गट या दोन्ही गटांना समसमान मते मिळाली. गिरीधर आसने व ससाणे गटाचे सुधीर नवले यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये सुधीर नवले यांचा विजय झाला. याचे शल्य विखे गटाच्या मनात नेहमीच होते. तेव्हापासून बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू होते. त्यातच विखे गटाचे नानासाहेब आसने यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा निबंधकांनी दोन दिवसांपूर्वी जितेंद्र गदिया यांना अपात्र ठरविले. त्यामुळे सुधीर नवले यांचे पद अल्पमतात आले होतेच, त्यातच काल नऊ संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळाची गणपुर्ती होणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात विखेंनी ससाणे-मुरकुटे गटाला दिलेला हा मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे.
या संचालकांनी दिले राजीनामे
उपसभापती अभिषेक खंडागळे, गिरीधर आसनेे, नानासाहेब पवार, सुनिल शिंदे, दीपक हिवराळे, सरला बडाख, अपक्ष किशोर कालंगडे या विखे गटाच्या संचालकांसोबत मुरकुटे गटाचे किशोर बनसोडे व ससाणे गटाचे खंडेराव सदाफळ यांचा राजीनामे देणार्या संचालकांत समावेश आहे.
प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नऊ संचालकांनी आपले राजीनामे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच बाजार समितीचे संचालक जितेंद्र गदिया यांनाही अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे आता कोरम अभावी बाजार समितीचे सभापतिपद अल्पमतात आल्याने प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.