श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
एकेकाळी नावाजलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या कारभाराला आता ओहोटी लागली असून कर्मचार्यांतील आपसी गटबाजीमुळे शहरातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या गटबाजीला लगाम लावून पालिकेचा कारभार लोकाभिमुख करण्याचे आव्हान नव्याने आलेले मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यापुढे उभे ठाकले आहे. पालिकेत प्रशासकीय राजवट येऊन आता जवळपास दोन वर्षे होत आली आहे. मालेगाव महानगरपालिकेचे विद्यमान उपायुक्त व श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांच्या काळामध्ये पालिकेच्या कारभाराला शिस्त लावायचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्यानंतर मुख्याधिकारी म्हणून आलेले जाधव यांच्या काळात पालिकेत कर्मचार्यांमध्ये उघड दोन गट पडले. पालिकेत कारभाराऐवजी कुरघोड्या करण्यातच वेळ जात असल्याने शहरांमध्ये पालिकेच्या विविध विभागातील अनेक प्रश्न निर्माण झाले.
अल्पावधीत जाधव यांची फैजपूर येथे बदली झाल्याने त्यांचे जागेवर दोन महिन्यापूर्वी मच्छिंद्र घोलप हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आणि लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. आचारसंहिता काळामध्ये नगरपालिकेचे कामकाज जवळपास ठप्प झाल्यासारखे होते. आता आचारसंहिता उठल्यानंतर मुख्याधिकार्यांनी पालिकेचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी पावले उचलली असून प्रत्येक विभागाचा लेखाजोखा घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन मुख्याधिकार्यांना भेटत आहेत. नागरी समस्यांचा डोंगर पाहून मुख्याधिकारी घोलप देखील चक्रावून गेले आहेत.त्यांनी यापूर्वी पाच ते सहा ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले असल्याने त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.त्यामुळे कर्मचारी काय करतात आणि नागरिक काय बोलतात याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे.
पालिकेचा आरोग्य विभाग सध्या सलाईनवर काम करतोय. शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेने ठेकेदार नेमलेला आहे. दरमहा मोठी रक्कम देऊन हा ठेका त्याला दिलेला आहे. मात्र, त्याने नेमलेले पर्यवेक्षक आणि इतर यंत्रणा अनेक भागांमध्ये फारसे काळजीपूर्वक काम करीत नाही असे दिसून येते. माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी शहरातील समस्यांसाठी निर्माण केलेल्या ‘आरोग्य सेवा’ या सोशल मीडिया ग्रुप वर दररोज प्रत्येक भागातील नागरिक आपल्या समस्या टाकतात. जी कामे नियमितपणे न सांगता झाली पाहिजे ती वारंवार सांगूनही होत नाही असा नागरिकांचा अनुभव आहे.त्यामुळे आरोग्य विभागामध्ये मोठे ‘ऑपरेशन’ करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय अनेक भागात कचरा उचलला जात नाही. रस्त्याची साफ-सफाई होत नाही.औषध फवारणी होत नाही. आरोग्य विभागातील पालिकेचे नियमित कर्मचारी व ठेकेदाराचे कर्मचारी नेमके काय काम करतात याचा नव्याने आढावा घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
बांधकाम खात्याची तर्हा तर खूपच निराळी आहे.पावसाळ्यानंतर शहरातील अनेक भागातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे दुरुस्तीचे काम करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम आता सुरू झालेले असले तरी उपनगरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. तेथून जाणार्या येणार्यांना खूप त्रास होतो. दुचाकी चार चाकी गाड्यांची संख्या वाढली. मात्र, रस्ते लहान झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे अनेकांना तापदायक ठरत आहेत. या खड्ड्यांमुळे शहरात पाठीचे आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा विभाग हा अलीकडे मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. पंधरा दिवसांपूर्वी कालव्याचे रोटेशन लांबल्याने शहराला पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.त्या काळात लोकांना अक्षरशः दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागले.शहरात अनेक भागांमध्ये गटारीच्या खाली पाईपलाईन असल्याने व लिकेजमधून गटारीचे पाणी पाईपलाईनमध्ये जात असल्याने अनेक भागांमध्ये आजही अस्वच्छ पाणी येते. याबाबत तक्रारी करूनही फारशी दखल घेतली जात नाही.
नेहरूनगर भागातील मुख्य जलवाहिनीवर एक वॉल लिकेज असल्याने गेली सहा महिन्यापासून तेथे रोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा नळ जोडण्याची संख्या वाढली आहे कुणीही येतो आणि नळ जोडून घेतो अशी परिस्थिती आहे. याकडे मुख्याधिकार्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.शहरातील उद्यानांची दुरावस्था झाली आहे. बाजार तळाजवळील उद्यान तर नामशेष झाले आहे. पालिकेच्या दवाखान्यात वेळेवर औषध पुरवठा होत नसल्याने रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरपालिका शिक्षण मंडळातील प्रश्न देखील प्रलंबित आहेत. मुख्याध्यापक नेमणुकांचे प्रस्ताव शिक्षण अधिकार्यांकडे गेलेले नाहीत. तसेच निवड श्रेणी व पदवीधर श्रेणीचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत. अशा विविध प्रश्नांग्रस्त झालेल्या नगरपालिकेच्या कारभाराला योग्य शिस्त लावून नागरिकांना चांगली सेवा देण्याचे आव्हान पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यापुढे आहे. त्यांचा कामाचा अनुभव पहाता ते हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील, अशी अपेक्षा श्रीरामपूरकरांना आहे.
सर्व अतिक्रमणे निघणार का ?
शहरामध्ये सर्वच भागात अतिक्रमणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुख्य रस्त्यांवर देखील अतिक्रमणे वाढल्याने दुकानदार सुद्धा वैतागले आहेत. आचारसंहितेपूर्वी मागील मुख्याधिकार्यांनी अतिक्रमण विरोधी मोहीम आखली होती. मात्र, भाजपचे नेते मंडळींनी त्यांची भेट घेऊन या मोहिमेला ‘ब्रेक’ दिला होता. आता निवडणूक झालेली असल्याने ही मोहिम सुरु झाली असली तरी सर्व अतिक्रमणे निघणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.