श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बालकांमार्फत गावठी पिस्टल विक्री करणार्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 26 नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक, कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक श्रीरामपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम आपल्या दुचाकी गाडीमध्ये विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल घेऊन श्रीरामपूर ते पुणतांबा जाणार्या रोडवर, हॉटेल निसर्ग परिसरात फिरत असल्याची माहीती मिळाली.
त्यानूसार पथकाने सदर ठिकाणी जाऊन पहाणी केली असता, दोन इसम त्यांच्याकडील यामाहा कंपनीच्या मोटार सायकलवर संशयीतरित्या फिरताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, ते दोघेही विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी आमचा मित्र शादाब जावेद शेख (वय 28, रा. वेस्टन चौक, वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्याकडून विक्री करण्याच्या उद्देशाने सदर विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशाच प्रकारचा एक विदेशी बनावटीचा गावठी पिस्टल शादाब शेख याच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे शादाब शेख याच्या घरी जाऊन चौकशी केली असता, त्याने त्याच्याकडे एक जीवंत काडतूस व विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल असल्याचे सांगितले. सदर कारवाई मध्ये 2 विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल, 3 जीवंत काडतुसे, 3 मोबाईल, मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शादाब जावेद शेख याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.




