वैजापूर/श्रीरामपूर |प्रतिनिधी| Vaijapur| Shrirampur
श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना सोमवार दि.20 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे समोर आले आहे.
श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महांकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी केशव वारे, चाँद पठाण यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकाने मिळालेल्या महितीच्या अनुषंगाने घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. तेव्हा त्यांना तेथे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करताना दिसून आले. पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले. मात्र, चालकाने पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर वैजापूर तालुक्यातील नागमठाणच्या दिशेने पळविला. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला, तेव्हा चालक नागमठाण शिवारातील एका शेतात ट्रॅक्टर सोडून पसार झाला. त्या ठिकाणी पथकडून पुन्हा जप्तीची कारवाई सुरू असताना अण्णासाहेब गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ, पोलिस पाटील गणेश नरहरे व अन्य चार ते पाच इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर बळजबरीने धक्काबुक्की करून तसेच ट्रॅक्टर मधील वाळू नागमठाण येथील शेतामध्ये खाली करून ट्रॅक्टर पळवून लावला.
याप्रसंगी गणेश नरहरे यांनी पोलिसांना मदत न करता ट्रॅक्टर चालक महेश गुंजाळ याच्यासह शंकर गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड व अन्य चार ते पाच जणांना ट्रॅक्टर पळून लावण्यासाठी मदत केली. या प्रकरणात अण्णासाहेब गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ व पोलीस पाटील गणेश नरहरे यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरोधात शासकीय वाळू चोरी करून पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
वाळू माफियांचा गुंडगिरी वाढली
वैजापूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून सर्वसामान्य जनता व पोलिसांनाही वाळूमाफिया दमदाटी करून मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
‘त्या’ पोलीस पाटला’वर निलंबनाची कारवाई
नागमठाण येथील घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होताच उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जर्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गावाचे तलाठी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांनी पोलीस पाटील यांच्याकडे मदत मागितली मात्र पोलीस पाटीलांनी वाळू माफियांचा मदत केली असा अहवाल सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जर्हाड यांनी चांदेगाव, (ता. वैजापूर) चे पोलिस पाटील गणेश नरहरे यांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ पारित केले. नरहरे यांच्याकडे नागमठाणचाही प्रभारी पदभार होता.
पुरणगाव येथेही ग्रामस्थांना मारहाण
जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करण्यास पुरणगाव येथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने तेथील ग्रामस्थांना मंगळवारी सकाळी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात ही वाळूतस्करांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.