अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीरामपूर शहरातील एका 19 वर्षीय युवतीच्या नावाने बनावट (फेक) इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून, त्याव्दारे तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने शनिवारी (1 नोव्हेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात इन्स्टाग्राम हँडलधारक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती श्रीरामपूर शहरात वास्तव्यास असून, ती शिक्षण घेत आहे. संशयित आरोपीने तिची परवानगी न घेता तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. हा प्रकार 3 जून 2025 रोजी किंवा त्यापूर्वी घडला होता. संशयित आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या बनावट अकाऊंटवरून पीडित युवती व तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आणि होणारा त्रास असह्य झाल्याने, पीडित युवतीने अखेर शनिवारी येथील सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
सायबर पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 356 (1) (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस या अकाऊंटचा तांत्रिक तपास करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर बनावट अकाऊंट ओपन करून बदनामी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.




