नाशिक | Nashik
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थासाठी हजारो कोटींची विकासकामे होणार आहेत. त्यातून शहरविकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. त्या अनुषंगाने देवळाली मतदारसंघातदेखील विविध विकासकामे व्हावीत. आमदार सरोज आहिरे यांचे मनोगत.
प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या (Nashik) सिंहस्थाचा सिंहस्थ व्हावा, सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, येणारे भाविक आपापल्या गावी जातील तेव्हा ते नाशिकचे नाव आवर्जुन घेतील, अशा सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांनी सांगितले.
‘पर्वणी सिंहस्थाची, आम विकासाची’ या संकल्पनेबाबत दैनिक ‘देशदूत’शी बोलताना आमदार सरोज आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिक महानगराची लोकसंख्या आजघडीला २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. २०१५ सालच्या सिंहस्थापेक्षा जास्त भाविक आगामी सिंहस्थाला (Simhastha) येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य शासन आणि महापालिकेने भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपल्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे आमदार आहिरे म्हणाल्या.
सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये अनेक विकासकामे अपेक्षित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून सिंहस्थाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लागेल, नाशिकरोड हे नाशिकचे मुख्य प्रवेशद्वार आहे. देशभरातील भाविक सिंहस्थासाठी रेल्वेने भोठ्या संख्येने दाखल होतील. त्यांच्यासाठी रेल्वे तसेच केंद्र सरकारने योग्य त्या सोयी-सुविधा कराव्यात. प्रयागराज दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यादरम्यान चेंगराचेंगरीच्या दुर्घटना पडल्या, अशा दुर्घटना नाशिकच्या सिंहस्थात होऊ नये याची काळजी नियोजन करताना आतापासूनच घ्यावी. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा विस्तार करून रेल्वेस्थानकाचा विस्तार करून आणखी किमान दोन फलाटांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अतिक्रमण हटवून परिसराचा विस्तार करावा, तसे झाल्यास प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर त्याला सुलभपणे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होता येईल.
नाशिकरोड (Nashik Road) परिसरातील रत्यांचे रुंदीकरण करावे. अनेक भाविक जेलरोडमार्गे प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण मार्गांचे आणखी रुंदीकरण करून भाविकांचा प्रवास सुखकर होईल, याकडे मनपाने लक्ष पुरवावे, दसक पंचक येथील गोदावरी नदीपात्राचे रुंदीकरण करून तेथे भाविकांना सिंहस्थासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध कराव्यात. गोदावरी नदीत सध्या मोठ्या प्रमाणात खडक व मोठमोठे दगड आहेत. ते काढून नदीपात्र समांतर करावे, त्यामुळे भाविकांना नदीपात्रात स्नान करताना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सिंहस्थात शहरातील सर्वत्र रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यासाठी मनपाने आराखडा तयार केला आहे. देवळाली मतदारसंघासाठी मनपा हद्दीतील रस्ते विकसित करावेत, वडनेर येथील वालदेवी नदीवर फूल बांधावा, नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडे जाणारे सर्व रस्ते विकसित करावेत असे आमदर आहिरे यांनी सांगितले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थासाठी हजारो कोटींची विकासकामे होणार आहेत. देवळाली मतदारसंघातसुद्धा विविध विकासकामे व्हावीत. पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वड़नेर गेटपर्यंत तीस मीटर डीपी रस्ता रुंदीकरण करून तो विकसित करावा. वडनेर दुमाला येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वडनेर गेट ते नाका नंबर चारपर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करून वालदेवी नदीचा पूल बांधावा, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचे सुशोभीकरण करावे, वडनेरगाव ते विहितगावपर्यंत अठरा मीटर डीपी रस्ता विकसित करावा, बिटको चौक ते देवळाली गावपर्यंत महात्मा गांधी रस्ता तसेच पुढे देवळाली गाव ते सौभाग्यनगर मनपा हद्दीपर्यंत लॅमरोड तीस मीटर डीपी रस्ता कॉक्रिटीकरण करावा, ‘सिटी लिंक’ बस डेपो ते नाशिक-पुणे मार्गापर्यंत १८ मीटर डीपी रस्ता विकसित करावा, अशी मागणी आहिरे यांनी केली. अनेक भाविक सिंहस्थात नाशिकरोड येथील मुक्तीधामला अवश्य भेट देतात. त्यामुळे मुक्तिधाम परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. येथे भाविकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील, त्यांचा प्रवास सुखरूप कसा होईल, याकडे लक्ष द्यावे, असेही आमदार आहिरे म्हणाल्या.
मुद्दे
- भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपबल्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.
- सिंहस्था दुर्घटना टाळण्यासाठी आतापासून नियोजन करावे.
- अनेक भाविक जेलरोडमार्गे प्रवास करण्याची शक्यता आहे. नाशिकरोड परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करावे.
- नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडे जाणारे सर्व रस्ते विकसित करावेत.
- मुक्तिधाम परिसरात मोठ्या प्रभागात गर्दी होण्याची शक्यता आहे. येथे भाविकांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात.




