नाशिक | Nashik
सिंहस्थासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येतील. त्यांचा प्रवास सुलभ व सुखकर व्हावा म्हणून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. विकासकामे करताना नाशिक-त्र्यंबकेश्वरला जोडणान्या प्रमुख मार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यावर भर दिला पाहिजे. त्यादृष्टीन केंद्र आणि राज्य सरकारचे संबंधित मंत्री आणि अधिका-यांशी मी संपर्क साधून पाठपुरावा करीत आहे, असे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी सांगितले.
सिंहस्थ पर्वात नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे लाखोंच्या संख्येने राज्यातून आणि देशभरातून भाविक, साधू-संत-महंत येतील. त्यांचे येथे येणे-जाणे सुलभ आणि सुखकर व्हावे म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वरला जोडणारे प्रमुख रस्ते चांगले होणे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेमागनिही भाविक मोठ्या संख्येने येतील, त्याचा विचार करता रस्ते विकास आणि रेल्वे सोयी-सुविधांवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे, असे मनोगत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले. दैनिक ‘देशदूत’च्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची या विषयावर विशेषांक प्रसिद्ध होणाऱ्या विशेषांकासाठी खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी मुलाखतीत आपले विचार मांडले.
सिंहस्थानिमित्त रस्ते विकासाबाबत त्यांची अनेक सूचना मांडल्या. जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या स्थितीबाबतही त्यांनी मतप्रदर्शन केले. रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. मात्र विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्या बांचत नसतील तर त्यांचा काय उपयोग? हा प्रश्न आम्ही सरकारकडे मांडला आहे. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचा विकास केला गेला. मात्र करोनाकाळात बंद केलेल्या गाड्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होते. गाड्याच धांवत नसतील तर स्थानकांचा विकास काय कामाचा? असा सवाल प्रवासी व नागरिक करीत आहेत. नाशिक-पुणे रेल्वे हा नाशिककरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संगमनेरमार्गे खर्च जास्त (सुमारे १२,००० कोटी) येतो; तर अहिल्यानगरमार्गे फक्त २,००० कोटीत काम होऊ शकते, अशी रेल्वेमंत्र्यांची भूमिका आहे. मात्र आधीचाच मार्ग निवडला जावा, अशी आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे (Central Government) आग्रह धरला जात आहे, असे खासदार वाजे म्हणाले.
सिंहस्थ (Simhastha) ही आपली धार्मिक परंपरा आहे. तो कोणाचाही खासगी कार्यक्रम नाही. यापूर्वी सिंहस्थ नियोजन व आयोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले जात होते. यावेळी प्रशासनाच्या बैठकीत लोकप्रतिनिधीना फारसे महत्त्व दिले गेले नाही. तरीही आम्ही प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने घेत आहोत. कोणत्या गोष्टीकडे सकारात्मक पाहायचे हे शेवटी आपल्या हाती असते, असे बाजे म्हणाले. सिंहस्थाच्या कामासाठी मी स्वतः हुन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येक अधिवेशनाआधी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व विभागीय महसूल आयुक्त यांच्याशी चर्चा केली. विकासकामांचे कोणते प्रस्ताव दिले आहेत? कोणत्या गोष्टींसाठी पाठपुरावा करायचा आहे? ते जाणून घेतले. त्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः, गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी तत्कालीन मनपा आयुक्त करंजकर यांच्याशी चर्चा केली होती. एसटीपी प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले गेले होते. त्यांचा पाठपुरावा केला. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. विकासकामांवर चर्चा करून कामांची दिशा ठरवताना मदत झाली, असे वाजे म्हणाले, प्रयागराज येथे झालेल्या गर्दीचा विचार करून नाशिकमध्ये योग्य नियोजन व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
नाशिकरोड-द्वारका (Nashik Road to Dwarka) मार्गावरील वाहतूक समस्या गंभीर आहे. सुरुवातीला येथे विशेष काम करण्याची आवश्यकता होती. मात्र सिंहस्थापूर्वी हे काम पूर्ण होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. द्वारकाची कोंडी नाशिककर कशी सहन करतात, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे काम सिंहस्थानंतर करण्याचे ठरले होते. मात्र येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण होऊ शकत नसल्याने त्यानंतर ते काम केले जाईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. इंदिरानगर व राणेनगर येथील बोगदे सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहेत. यासाठी ठेकेदार व प्रकल्प संचालकांशी चर्चा करून कटाक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे. मेट्रोबाबत केवळ घोषणा झाली होती. केवळ पत्र देणे आणि कामाचा योग्य दिशेने पाठपुरावा करणे यात तफावत आहे. प्रत्यक्षात दोन मंत्रालयांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प पुढे सरकला नाही. नाशिकमध्ये अद्याप मेट्रोची गरज नाही, असे महामेट्रोचे अधिकारी हडर्डीकर यांचेही मत आहे. शहराच्या (स्त्यांची सद्यस्थिती पाहता डेडिकेटेड लाईन बसवणे अवघड ठरेल. त्यामुळे सध्यासाठी हा विषय पुढे ढकललेला गेला आहे, असे वाजे म्हणाले.
रेल्वे मंत्रालयाने ओढा व पाडळी स्थानकांच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र विकसित केलेल्या स्थानकांवर गाड्या नसतील तर त्याचा उपयोग काय? हा प्रश्न मांडला आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गा खरेदी केलेल्या भूखंडाची माहिती मी गोळा केली आहे. पुणे आणि नाशिककडून दोन्ही बाजूंनी जागा अधिग्रहण झाले आहे. सुमारे ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याचा विचारही करणे गरजेचे आहे, असे वाजे यांनी सांगितले. सिंहस्थानिमित्ताने रिंगरोडचे काम झाल्यास त्याचा लाभ पुढील अनेक वर्षे नाशिककरांना मिळेल. शासकीय रुग्णालयांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे योग्य नाही, याकडे वाजे यांनी लक्ष वेधले. विमानतळाच्या दृष्टीने टर्मिनल व रन-वे वाढवण्याची कामे करणे आवश्यक आहे. सध्या दिल्लीसाठी सेवा आठवड्धात फक्त तीन दिवस आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यानंतरच केंद्र सरकारकडून निधी मिळतो, असा मागील वर्ष-दीड वर्षाचा अनुभव आहे. विमानतळ विकासाबाबत बोलताना केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांनी हे विमानतळ राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने राज्य शासनाने त्यावर निधी खर्च करावा, असे म्हटले होते, असे वाजे यांनी सांगितले.
गोदावरीचे (Godavari) सुशोभीकरण करण्यापेक्षा प्राथमिक सुविधांवर भर द्यावा व नदी स्वच्छ राखली जावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकदा सुशोभीकरणावर खर्च झाल्यानंतर त्याची देखभाल करण्याचा खर्च मनपाला परवडत नाही. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना म्हणून स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. सिंहस्थासोबतच कावनई, बेझे या भागांत विशेष नियोजन करणे गरजेचे आहे. मध्यंतरी आम्ही सिन्नर (Sinnar) येथील राममंदिरालगतचा एक कुंड स्वच्छ केला होता. तसेच तेथील माधवदास राठी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे, सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्या स्थळापासून बारा योजन परिघातील सर्व कुंड सिंहस्थ कुंडांइतकेच महत्त्वाचे मानले जातात. अनेक संत-महंतांनी मुख्य स्नानानंतर या कुंडांत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कुंडांची स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार होणे आवश्यक आहे, असे वाजे यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ हा लोकांचा उत्सव आहे. सुरक्षिततेसोबतच तो लोकांनी आनंदाने साजरा करणे महत्त्वाचे आहे. दोन वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेनंतर अतिशय कडक नियम घालण्यात आले. त्यामुळे अमृतस्नानाला अपेक्षित गर्दी झाली नाही. लोक घरबसल्या उत्सव साजरा करू लागले, ही योग्य बाब नाही. प्रशासनाने तयारी करताना सुरक्षेसह लोकांचा सहभाग वाढेल, याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा खासदार वाजे यांनी व्यक्त केली.
मुद्दे
- रस्ते विकास आणि रेल्वे सोयी-सुविधांवर अधिक भर देण्याची आवश्यकता.
- रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाती घेतला गेला. मात्र विकसित रेल्वे स्थानकांवर गाड्याच थांबत नसतील तर काय उपयोग?
- नाशिक-पुणे रेल्वे हा नाशिककरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे संगमनेरमार्गे खर्च जास्त येतो अहिल्यानगरमार्गे कमी पैशांत काम होऊ शकते, असे रेल्वेमंत्री म्हणतात. मात्र आधीचाच मार्ग निवडला जावा.
- सिंहस्थाविषयी प्रशासन बैठकीत लोकप्रतिनिधींना फारसे महत्त्व दिले गेले नाही. तरीही आम्ही प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने घेत आहोत.
- विमानतळासाठी टर्मिनल व रन-वे वाढवण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.




