Monday, November 25, 2024
Homeब्लॉगसाधी अपेक्षा

साधी अपेक्षा

साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षणानिमित्त लोणावळ्याला गेले होते. प्रशिक्षणाचे ठिकाण तसेच राहण्याची सोय एका उत्तम रिसॉर्टमध्ये केली होती. प्रशिक्षण 4 दिवसांचे होते. पहिल्याच दिवशी त्या आवारात जवळपास उपलब्ध असणारी पाने, फुले वापरून प्रवेशद्वाराजवळ एक सुंदर रांगोळी काढलेली होती. रांगोळी काढणारी एक मुलगी होती. मी तिच्यापाशी घुटमळले. सवयीप्रमाणे मोबाईल काढला आणि फोटो काढू लागले. मी फोटो काढत असल्याची चाहूल लागताच तिने माझ्याकडे हळूच कटाक्ष टाकला. दोघींची नजरानजर झाली.

रंगाने सावळी होती ती. वय 17 -18 वर्ष असावं. ठळकपणे दिसतील असे दाट पापण्याच्या सुरक्षित असणारे बोलके डोळे, सरळ पण थोडे बसके नाक, त्या नाकात चांदीची गोल तार, एका बाजूने थोडा चिरलेला कान, कुरळ्या केसांची कंबरेपर्यत येणारी एक जाडजूड वेणी आणि कपाळावर फॅन्सी टिकली. एक साधा पंजाबी ड्रेस तिने घातला होता. मात्र ड्रेस बराच मळका होता. मी तिच्याकडे बघून हसले. तिने दुर्लक्ष करून पुन्हा रांगोळी सजवायला सुरुवात केली. मला थोडं वाईट वाटलं.

तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्नाला मी सुरुवात केली.

- Advertisement -

मी : मस्त काढलीस रांगोळी.

ती : (खाली मानेने) हम्म्म्म.

मी : नाव काय गं तुझं?

ती : मी विचारलं का तुम्हाला तुमचं नाव?

मी: नाहीपण मी अमृता.. तू.. तू सांग ना तुझं नाव.

ती : अश्विनी

मी : बघ आपण सेम सेम माझं पण नाव अ पासून सुरु होतं.

अश्विनी : हम्म्म. तुम्ही इकडे प्रशिक्षणाल्या आल्या का? ते तिकडे आतमध्ये जा. वेळ झाली. उगाचच माझ्या चौकश्या करू नका.

मी : हो सॉरी हं बाय

मी तिथून निघाले. आतमध्ये जाऊन नोंदणी केली. माझ्या खोलीची चावी घेऊन मी खोलीत गेले.

प्रशिक्षण सुरु व्हायला अजून एक तास वेळ होता. कॉफी मागवण्याच्या उद्देशाने मी रिसेप्शन काउंटरला फोन केला. त्यांना खोली नंबर सांगून कोल्ड कॉफ़ी देण्याबाबत सांगितले. साधारणत: 20 मिनिटांनी बेल वाजली. मी दार उघडले. अश्विनी कोल्ड कॉफ़ी घेऊन वर आली.

मी : अगं.. तू ये अश्विनी

अश्विनी : हम्म्म.

मी : बसतेस .? आपण दोघी घेऊ अर्धी अर्धी कॉफी.

अश्विनी : नक.

मी : काय झाले? आवडत नाही का तुला कॉफी?

अश्विनी : तुम्ही का बोलताय माझ्याशी..? नका बोलू. मला खाली जायचयं पुन्हा. तो दरवाजा उघडून द्या. मला येत नाहीये.

मी : ठीके साधे तर बोलतेय बाळा मी तुझ्याशी.

मी तिच्याशी बोलता बोलता दरवाजा उघडला. अश्विनी बाहेर गेली. मी कॉफी घेताना तिचा विचार करत होते. खूप चमत्कारिक वागणे होते तिचे.

थोड्या वेळाने प्रशिक्षणाची वेळ झाली. मी प्रशिक्षण हॉलमध्ये गेले. बरेच प्रशिक्षणार्थी शिक्षक आले होते. सुरुवातीला सर्वांची ओळख करून घेण्याच्या उद्देशाने मी सर्व प्रशिक्षणार्थीना हॉल बाहेरील मोकळ्या आवरात गोल करून उभे राहायला सांगितले. तिथे अ‍ॅक्टिव्हिटी घेताना लक्षात आले की, अश्विनी झाडापाशी बसलीये. तिथे असलेल्या लॉनमधले गवत काढण्याचे काम ती करत होती. मी वर्गात गेले. माझे सत्र साधारणत: दीड तासाचे होते. त्यानंतर मी बाहेर आले पुन्हा.

माझी नजर अश्विनीला शोधू लागली. तिच्या बोलण्यातल्या जाणवलेला परकेपणा मला खदखदत होता. रिसॉर्टच्या तरणतलावापाशी ती मला दिसली. ती कशी बोलेल याचा अंदाज मनात बांधला होता. पण तरीही बोलण्याची इच्छा झाली. मी तिच्याजवळ गेले. तरणतलावातला कचरा काढण्याचे काम ती करत होती.

मी : हाय बाळा. कचरा काढतेयस का?

अश्विनी : दिसतंय ना मॅडम तुम्हाला.?

मी : हो गं पण सहज तुझ्याशी बोलावे वाटले म्हणून आले.

अश्विनी : काही काम आहे का तुमचं?

मी : नाही गं.. सहज..

तू इथे काम करतेस का?

अश्विनी : हो. पण आता तुम्ही जा.

हे बोलताना ती नजर चुकवत होती.

मी : बरे. जाते मी. पण तुला काही त्रास असला तर मला सांग हं.

मी तिथून निघाले. मागून अश्विनी हळूच म्हणाली, संध्याकाळी त्या नाक्यावरच्या कृष्णा हॉटेल ला भांडी घासायला जाते मी.

या वाक्यातून असा अंदाज आला की त्या ठिकाणी आम्ही भेटून बोलू शकू.

संध्याकाळी 6 वाजता मी आजूबाजुला नाका आणि तिथले कृष्णा हॉटेल शोधत तिथे पोहोचले.

हॉटेल सापडले. पण अश्विनी काही दिसली नाही. तिथे बसून मी चहा घेतला. साधारणत: 6.30 वाजता अश्विनी आली. मला बघून ती माझ्या टेबलजवळ आली.

मी : बस. चहा घेतेस का?

अश्विनी : नको मॅडम. बसते मी

मी : बोल पण तू नेहमी अशीच रागात बोलतेस का गं?

अश्विनी : (गालातल्या गालात हसून ) नाही मॅडम. पण त्या तिकडे रिसॉर्टमध्ये माझे सासरे पण आहेत.

मी : एवढीशी दिसतेय. लग्न कधी झाले?

अश्विनी : हो चार वर्ष झाली. पण आता कर्ज होतं म्हणून मंगळसूत्र गहाण ठेवलंय.

मी : असो.. पण बाळा तू आहेस किती वर्षाची..? मला तर तू लहान वाटतेस.

अश्विनी: जाऊ द्या ना मॅडम. आता काय करणार?

पाळी आली आणि चुलत्याने लग्न लावून दिले. माझे वडील अपघातात गेले. मग चुलत्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नाही. ह्यांच्याशी लग्न लावून दिले. पण मग नंतर कळलं की ह्यांचं अजून एक लग्न झालेय. पण त्या ताई आजारी असतात. जातील एक वर्षात कायमच्या वरती.

मी : बापरे पण मग आता?

अश्विनी : आता काही नाही. मी राहतेय तिकडेच. पण ना त्या रिसॉर्टमध्ये माझे सासरे आहेत ना.. त्यांना नाही आवडत मी कोणाशी बोललेलं. मला छोट्या कामासाठी जरी वेळ लागला तरी ते खूप रागावतात. मग मी नाही बोलत कोणाशी.

मी : मग गं आज इथे कशी आलीस?

अश्विनी: आज इथं काही खूप काम नव्हतं. आणि तुम्ही माझ्याशी सारखं बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मी सगळयांना उडवाउडवीची उत्तरे दिली की कोणी बोलायला येत नाही. पण तुम्ही बोलल्या माझ्याशी म्हणून म्हंटले बोलूया.

मी: बरे शिक्षण किती केले आहेस?

अश्विनी : आता ह्यावर्षी बाहेरून बारावीची परीक्षा देणार आहे. नवरा चांगला आहे माझा. मला शिकवणार आहेत पुढे. ते म्हणाले की तू शिक्षक हो. पण आमच्या घरी माहिती नाही. सासरे खूप रागावतात.

मी: चला बरे झाले. निदान तू शिकते तरी आहेस.

अश्विनी: तुम्ही एक काम कराल माझं? माझी आई आणि एक बहीण सध्या तुमच्याच नाशिकजवळ निफाडला द्राक्षबागेत काम करताय. त्यांच्याशी बोलायचं आहे मला. फोन लावून द्याल का?ह्यांच्या फोनवरून लावला असता फोन पण ते जास्त बोलता येत नाही.

मी: ठीक आहे.. घे फोन.. बोलून घे.

अश्विनीने फोन घेतला. माझ्यापासून थोडे लांब गेली. नंबर डायल करून ती तिच्या आईशी पंधरा- वीस मिनिटे बोलली. बोलताना डोळ्यातून पाणी येत होते. बोलून झाल्यावर तिने माझा फोन मला परत दिला.

मी : काय गं सगळं ठीक ना. रडत होतीस म्हणून विचारलं.

अश्विनी : आईशी खूप दिवसांनी बोलले म्हणून रडले.

मी : नक्की ना.. काही त्रास नाही ना तुला.?

अश्विनी : नाही मॅडम. आता मी आणि आमचे हे पुण्याला जाणार आहे कामाला. पण त्यांची बायको मेली की.

मी : असं कोणाच्या मरणाची वाट बघणं बरं नाही बाळा.

अश्विनी: पण त्या जाणारचं आहे ना. आणि त्या गेल्या म्हणजे आम्ही पुणे ला जाऊ. म्हणजे सासरे त्रास देणार नाहीत. आणि मला आईशी बोलता येईल. मला शिकायचं आहे. आता लपूनछपून शिकायला आवडत नाही मला.

मी : शिक बाळा.. हो मोठी हो खूप. चल निघूया आता. तुला परत कोणीतरी रागवेल.

आम्ही तिथून निघालो.

आपल्या सभोवती अनेक जण असतात. त्यांच्या वागण्यातले बारकावे टिपता यायला हवेत. कोणाच्या तरी मरणाने आपले आयुष्य सुखी होईल एवढीच त्या मुलीची अपेक्षा होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या