Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : सीना पूरस्थिती कायम; दुसर्‍या दिवशी कल्याण रस्ता बंद

Ahilyanagar : सीना पूरस्थिती कायम; दुसर्‍या दिवशी कल्याण रस्ता बंद

नागरिकांचे अतोनात हाल || नगर शहरासह तालुक्यात मुसळधार कायम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकुळ सुरू असून नगर शहर आणि तालुक्यात 13 सप्टेंबरपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. परिणामी सीना नदीला पूर आला असून सोमवारी पहाटेपासून कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती. मंगळवारी सांयकाळपर्यंत ती कायम असल्याने कल्याण रोडवरील रस्ता वाहतूक मार्ग बंद होता. पावसात खंड नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

- Advertisement -

नगर शहरालगत सीना नदी वाहत असून कल्याण रोडसह शहराचा पूर्व भाग नदी पात्राजवळ असल्याने नदीला पूर आला होता. यंदाच्या पावसाळ्यात सीना नदीला तिसर्‍यांदा पूर आला असून 13 सप्टेंबरपासून सतत पडणार्‍या पावसामुळे नदीच्या पूराचे पाणी कमी होतांना दिसत नाही. शहरातील सखल भागात पूराच्या पाण्याचा फटका बसतांना दिसत आहे. नदी पात्रालगत वाढलेल्या रहिवासी इमारती आणि नदीपात्राच्या मूळ प्रवाहात अडथळा येत असल्याने पूराचे पाणी शहरातील काही भागात शिरतांना दिसत आहे. यामुळे अनेकांच्या घरात देखील पूराचे पाणी घुसले. दरम्यान, शहराच्या हद्दीत मनपा प्रशासनाच्यावतीने परिस्थितीवर लक्ष असून नागरिकांच्या मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

YouTube video player

नगर शहर आणि तालुक्यातील 12 महसूल मंडळात सोमवारी दमदार पाऊस झालेला असून यामुळे पूर परिस्थिती अजून बिकट होतांना दिसत आहे. सोमवारनंतर मंगळवारी सकाळी काही काळ पावसाने उघडीप दिल्यानंतर दुपारी चारनंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. यामुळे शहरातील ओढे नाले, सखल भागात पाणी साठवले होते. या पुढे असाच पाऊस सुरू राहिल्यास नागरिकांचे हाल होणार असल्याचे दिसत असून मनपा प्रशासनाने तातडीने शहरातील मूळ नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळ करण्याची मागणी होत आहे.

तसेच पूरनियंत्रण रेषेवर झालेले अतिक्रमण काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी पहाट कल्याण रोडवरील वाहतूक बंद झाल्याने नालेगावच्या पूूर्वकडील भाग, कल्याण रोडवरील विविध उपनगरे या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना काटवन खंडोबा अथवा केडगाव बायपास रस्त्याचा आधार घ्यावा लागला. कल्याण रस्ता बंद असल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थी यांना मोठा फटका बसला. सध्या नवरात्री उत्सव सुरू असून त्यात दोन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे सर्वांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.

तालुक्यातही अनेक ठिकाणी फटका
नगर शहरासह तालुक्यात दररोज होत असलेल्या पावसामुळे जुनी वाडी ते बारदरी गेल्या 10 दिवसापासून संपर्क तुटलेला आहे. जनावरांना चाराही नाही, मुलांच्या शाळाही बंद आहेत. दुधही घरीच आहे. पावसामुळे नारिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारकडे नदीवरील पुलासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कोणतीही अंमलबजावणी होत नाही. तातडीने पुलाचे काम न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ताज्या बातम्या