सिंधुदूर्ग | Sindhudurga
भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आहे. सिंधुदूर्गातील एका सभेमध्ये बोलताना त्यांनी जी विधाने केली, त्यावरून नारायण राणे आता राजकारणातून संन्यास घेणार असा अंदाज लावला जात आहे. “आता घरी बसायचे ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन… नांदा सौख्यभरे…” असे भावनिक उद्गार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात काढले. यानंतर आज (05 जानेवारी) चिपळूण येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणेंना अचानक भोवळ आली. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले. मात्र आता नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीच्या संकेतावरून यू-टर्न घेतला आहे.
कृषी महोत्सवाच्या कार्यकमावेळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आता, नारायण राणेंनी तब्येतीलबद्दल माहिती देत मी ठीक आहे, असे म्हटलेले. तसेच, राजकीय निवृत्तीचे संकेत कोणी दिले? मी तसं बोललो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूणमधील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात नारायण राणेंना भोवळ आली होती, त्यांचा आवाजही बसल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र, आता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली. आता माझी तब्येत ठीक असल्याचंही त्यांनी सांगितले. भाषणात बोलताना माझं ब्लड प्रेशर लो झाले होते आणि डायबेटिस शुगर सव्वातीनशेच्या वर गेली होती. त्यामुळे, मला अस्वस्थपणा आणि चक्कर आली होती. मात्र, आता मी ठीक आहे, असेही राणेंनी सांगितले.
निवृत्तीचे संकेत कोणी दिले?
“निवृत्तीचे संकेत कुणी दिले? असं मी काहीही बोललो नाही. माझं वाक्य नीट ऐका. मी जर लोकांचा रिझल्ट देऊ शकलो नाही, तर माझ्या या पदांचा उपयोग काय? मग मी विचार करेन असं माझं वाक्य होतं. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं मी म्हणालो होतो. निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या.
भाषण सुरु असतानाच नारायण राणेंची तब्येत बिघडली; आवाज बसला, चक्कर आली…
काल राणे काय म्हणाले होते?
“मी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळीच मी म्हटलं होतं की, माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष असेल. त्यामुळे पक्षबदल वगैरे चर्चा करण्याची काही गरज नाही. परंतु माझा एक स्वभाव आहे. जगेन तर स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही. पण एवढी पदे मला मिळाली आहेत. त्याचा लोकांसाठी उपयोग करणे गरजेचे आहे. मी पदाची अपेक्षा करत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी मी जे.पी. नड्डा यांची वेळ मागितली आणि त्यांना भेटायला गेलो. तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला व्यवसाय करायचा आहे असं मी त्यांना सांगितले. त्यावर राणेजी, तुम्ही राजकारणातून बाहेर जाऊ नका, आम्ही तुम्हाला तसे करू देणार नाही, असे ते म्हणाले होते. पण मी म्हटले होते की, माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करताय. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. मी कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रीय झाल्याने व्यवसायही पाहायला पाहिजे,” असे राणे भाषणाच्या वेळी म्हणाले होते.





