मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी गायिका अंजली भारती हिने अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही अमृता फडणवीस यांची पाठराखण केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, संजय राऊत या सर्व नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत या प्रकाराच निषेध केला.
गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. भंडाऱ्यात १३ जानेवारी रोजी भीम मेळावा झाला. या मेळाव्यात अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचार संदर्भात जोरदार टिकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी वाढते बलात्कार आणि न होणारी कारवाई याबद्दल चीड व्यक्त करताना अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केले. या अत्याचाराविरोधात बोलताना अंजली भारती यांनी अमृता देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांना शिक्षा देण्यासंदर्भात अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकून निषेध करत असल्याचे ट्विट ठाकरे गटाच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनीही अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटले.
संजय निरुपम यांच्याकडून निषेध
‘लज्जास्पद विधान! ही महिला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्काराची वकिली करत आहे. माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे, पण अशा प्रकारे नाही. निषेध! निषेध! निषेध!’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही अंजली भारती हिच्यावर टीका केली आहे.
चित्रा वाघांचा संताप
“श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?
हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम
अंजली भारती काय म्हणाल्या होत्या?
गायिका अंजली भारती भीम मेळाव्यात बोलताना बलात्कार, अत्याचाराविरोधात राग व्यक्त करत होत्या. या वादात त्यांनी अमृता फडणवीस यांना खेचले. अंजली भारती यांचे वक्तव्य सूडाचे असल्याची टीका होत आहे. या शिवाय त्या बरेच काही बोलल्या आहेत. जो बलात्कार करतो, त्याचं डोकं, मान कापा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जो कुणी बलात्काऱ्याचे डोकं, मान कापून आणेल त्याला माझी अर्धा संपत्ती देईन आणि ५० लाख रुपये देईन अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.





