नाशिक। Nashik
अकरावी प्रवेश प्रक्रियेत नाशिक विभागात 62 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. पहिल्या फेरीतून 52 हजार, 537 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, उर्वरित 9 हजार 497 विद्यार्थ्यांना कोट्याच्या जागांवर संधी मिळाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अकरावीच्या केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत दिलेली होती. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावयाचे होते.
गेल्या सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी बघायला मिळत होती. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश निश्चितीची लगबग कायम राहिली. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता दुसर्या नियमित फेरीचे वेध लागले आहेत.
बुधवारी (दि.9) रिक्त जागांचा तपशील शिक्षण विभागातर्फे जाहीर केला जाणार आहे. याच दिवशी दुसर्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.




