नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लक्ष्मण कुंडाच्या पाठीमागे स्मार्ट सिटी कंपनीने उभारलेला मोठा चेंबर १७ नोव्हेंबर रोजी तोडण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या पैशातून उभारलेले बांधकाम काही काळातच तोडण्याची वेळ का आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तोडफोड करण्याची वेळ येत असल्याने नियोजनाचा आणि संबंधित विभागांतील समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधी बांधकामावर खर्च आणि त्यानंतर तोडफोड व नव्या बांधकामासाठी पुन्हा खर्च, यामुळे सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. चेंबर तोडण्यामागील तांत्रिक कारण काय, यापूर्वी किती खर्च झाला आणि नव्याने किती खर्च होणार, याची माहिती प्रशासनाने द्यावी.
संपादकीय : १८ नोव्हेंबर २०२६ – निवारा मिळेल; पण तहान कशी भागेल?
तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी, अशी मागणी गोदावरीप्रेमी देवांग जानी यांनी केली आहे. रामकुंडाच्या तळाला टाकलेले काँक्रीट गोदावरीच्या मुख्य प्रवाहाला अडथळा ठरत असताना ते काढण्याऐवजी नव्याने उभारलेले बांधकाम तोडून त्याच ठिकाणी दुसरे बांधकाम करणे कितपत योग्य आहे, असा सवालही जानी यांनी उपस्थित केला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकाच कामावर वारंवार होणारा खर्च थांबवून नागरिकांच्या पैशांचा हिशेब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी होत आहे.




