Wednesday, November 18, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १८ नोव्हेंबर २०२६ - निवारा मिळेल; पण तहान कशी भागेल?

संपादकीय : १८ नोव्हेंबर २०२६ – निवारा मिळेल; पण तहान कशी भागेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध गृहयोजना राबविल्या. स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणार्‍या लाखो कुटुंबांसाठी या योजना निश्चितच आशादायी आहेत. मात्र, घर मिळणे म्हणजे जीवनाचा प्रश्न सुटणे नव्हे. त्या घरात सन्मानाने जगण्यासाठी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, घरांच्या निर्मितीला प्राधान्य देताना पाण्यासारख्या अत्यावश्यक गरजेकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात असल्याचे दिसत नाही. घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तहानलेल्या भविष्याची पायाभरणी तर होत नाही ना, हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

महामुंबईत २०३० पर्यंत आठ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढते नागरीकरण आणि गृहप्रकल्पांची संख्या पाहता हा आकडा महत्त्वाचा आहे. परंतु या विस्ताराला पुरेसा पाणीपुरवठा करणारे स्रोत उपलब्ध आहेत का, हा त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे. पण हा प्रश्न एकट्या मुंबईचा नसून प्रत्येक गाव, शहराचा आहे. आज अनेक शहरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. नव्या इमारती उभ्या राहत आहेत, गृहप्रकल्प आकार घेत आहेत, लोकसंख्येची घनता वाढत आहे; मात्र त्या तुलनेत पाण्याची उपलब्धता आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्याचे नियोजन कितपत झाले आहे? विकासाच्या या वेगात पाण्याचा हिशेब मांडला जात नसेल, तर उद्याचे चित्र चिंताजनक ठरू शकते. माणूस स्वतःच्या कष्टाने निवारा उभारू शकतो. आर्थिक परिस्थितीनुसार छोटेखानी घर बांधू शकतो, प्रसंगी त्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च करू शकतो. पण पिण्याचे पाणी स्वतः निर्माण करू शकत नाही. त्यासाठी निसर्गातील जलस्रोत, सक्षम यंत्रणा आणि सरकारचे नियोजन आवश्यक असते.

घराचा ताबा मिळाल्यानंतर नळाला पाणीच आले नाही, तर त्या घराच्या स्वप्नाला काय अर्थ उरतो? पाणी विकत घेण्याची वेळ आली, तर सामान्य कुटुंबाच्या मासिक अर्थसंकल्पावर अतिरिक्त भार पडणार नाही का? विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाण्याची समस्या ही केवळ उपलब्धतेपुरती मर्यादित नाही. पाण्याचे स्रोत, साठवण क्षमता, शुद्धीकरण, वितरण व्यवस्था आणि गळती रोखणे या सर्व बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन धरणे, जलाशय, पुनर्वापर प्रकल्प आणि पर्यायी जलस्रोत यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी साठवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा बिगरपिण्याच्या कामांसाठी पुनर्वापर करणे आणि भूजलाचे संवर्धन करणे या उपाययोजनांना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणावे लागेल. नव्या गृहप्रकल्पांना मंजुरी देताना पाणीपुरवठ्याची खात्री, जलस्रोतांवरील ताण आणि भविष्यातील गरजा यांचे मूल्यमापन अनिवार्य असले पाहिजे. याचा अर्थ गृहबांधणीच्या योजना थांबवाव्यात, असा मुळीच नाही. प्रत्येकाला हक्काचे घर मिळणे ही सामाजिक गरज आहे. मात्र, घरबांधणी आणि पायाभूत सुविधांचा विकास या दोन स्वतंत्र बाबी मानण्याची चूक होता कामा नये. घरांची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करताना त्या घरांमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या मूलभूत गरजांची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे.

केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, विकास प्राधिकरणे आणि संबंधित जलपुरवठा यंत्रणा यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा एका विभागाने घरे बांधायची आणि दुसर्‍या विभागाने पाणीपुरवठ्याच्या मर्यादांचे कारण द्यायचे, अशी विसंगती निर्माण होईल. शिवाय पाण्याचा प्रश्न हा केवळ आजच्या रहिवाशांचा नाही; तो पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचाही आहे. हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढती मागणी आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यांचा विचार करून दीर्घकालीन जलव्यवस्थापन धोरण आखावे लागेल. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याची नासाडी रोखणे याबाबत जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

मात्र, नागरिकांच्या सहभागाबरोबरच सरकारची उत्तरदायित्वपूर्ण भूमिका अधिक महत्त्वाची आहे. विकासाची खरी कसोटी केवळ किती घरे बांधली, किती इमारती उभ्या राहिल्या किंवा किती प्रकल्प पूर्ण झाले, यात नसते; तर त्या घरांमध्ये राहणार्‍या माणसांचे जीवन किती सुरक्षित आणि सुसह्य झाले, यात असते. आठ लाख घरांचे उद्दिष्ट निश्चित करताना प्रत्येक घरापर्यंत पुरेसे आणि नियमित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्टही निश्चित झाले पाहिजे. कारण घराला छप्पर असणे जितके आवश्यक, तितकेच त्या घरातील माणसाला पाणी मिळणेही आवश्यक आहे. घरांच्या चाव्या हातात देण्यापूर्वी नळातून पाण्याची हमी देण्याची वेळ आली आहे. अन्यथा घरांचे स्वप्न साकार होईल; पण त्या घरांमध्ये तहानलेले वास्तव मात्र कायम राहील!

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित हॉटेल

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्‍या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि...