सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या, मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा आज जन्मदिन. अवघ्या १० वर्षांच्या सिनेकारकिर्दीतील त्यांचं आयुष्य बऱ्याच घटनांमुळे चर्चेत राहिलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही किस्से…
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९५६ साली झाला होता. स्मिता यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही लाईमलाईटमध्ये चर्चा झाली. विशेषत: अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.
स्मिता पाटील यांच्या नावामागेही एक किस्सा आहे. त्यांची आई विद्याताई पाटील यांनी स्मिता यांच्या सुंदर हास्यामुळे त्यांचं नाव ‘स्मिता’ असं ठेवलं होतं. पुढे हेच नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं ठरलं. तसंच, त्यांचं हास्यदेखील त्यांच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक बनला.
स्मिता पाटील यांनी सुरवातीला दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून काम केले. असे म्हणतात कि त्या दूरदर्शनच्या सेटवर जातांना टी शर्ट आणि जीन्स घालून जायच्या आणि तिथे गेल्यानंतर जीन्सवरच साडी घालायच्या.
श्याम बेनेगल यांनी एकदा स्मिता यांना वृत्त निवेदन करतांना बघितले आणि त्यांच्यातील अभिनय क्षमता ओळखली. त्यांनी १९७५ मध्ये स्मिता पाटील यांना पहिला ब्रेक दिला. चरण दास चोर या चित्रपटात रोल दिला आणि त्यांनीही संधीचे सोने केले.
स्मिता पाटील त्यांच्या गंभीर अभिनयामुळे ओळखल्या जात असत. मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल, की पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या स्मिता या खऱ्या आयुष्यात मात्र, खूप मस्तीखोर होत्या.
स्मिता पाटील यांना त्यांच्या अभिनयासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड आणि पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले होते. स्मिता पाटील आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जात. स्मिता पाटील यांनी अनेक अभिनेत्यांसोबत काम केले होते.
मृत्यूनंतर आपला सौभाग्यवतीप्रमाणे मेकअप करावा अशी स्मिता यांची इच्छा होती. याबाबत त्यांनी तिचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांना सांगितले होते. दीपक यांनी देखील त्यांची शेवटी इच्छा पूर्ण केली.
याबाबत दीपक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दुःख व्यक्त करत, ‘मला काय माहित होते की मला असे काम करावे लागेल, जे जगातील क्वचितच कोणत्याही मेकअप आर्टिस्टने केले असेल. मृत्यूनंतर स्मिताची शेवटची इच्छा पूर्ण करताना मी त्यांचा सौभाग्यवतीसारखा मेकअप केला होता.