Sunday, October 20, 2024
Homeनगरकोल्हेंना भाजपाकडून राज्यसभेचा प्रस्ताव ?

कोल्हेंना भाजपाकडून राज्यसभेचा प्रस्ताव ?

भाजपत रोखण्यासाठी केंद्रीय नेतृत्व सक्रीय

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

दोन दिवसांपूर्वी भाजपचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मनधरणी केल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने सक्रीय होत, त्यांना राज्यसभेचा प्रस्ताव दिल्याचे संकेत कोल्हे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. मतदारसंघात विवेक कोल्हे विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास महायुतीतच बंडाळी होण्याच्या शक्यतेने भाजपकडून त्यांना रोखण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

चार दिवसांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुतीतून विद्यमान आमदार आशुतोष काळे लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर कोल्हे महाविकास आघाडीकडून मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली. मात्र कोल्हे यांची भाजपकडून मनधरणी सुरू आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी त्यांच्याशी शनिवारी मुंबईत चर्चा केली. या बैठकीत कोल्हेंसमोर विधानसभेएवजी राज्यसभेचा पर्याय ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. यास पक्ष किंवा कोल्हे परिवारातून दुजोरा मिळाला नसला तरी स्नेहलता कोल्हे यांच्या पोस्टवरून विविध तर्क लढवले जात आहेत.

स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती झाल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्री व महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या तिढ्यातून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी व कोल्हे कुटुंबाने पक्षासमवेत रहावे, यासाठी केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली आहे.

स्व. शंकरराव कोल्हे ते विवेक कोल्हे यांच्यापर्यंत असलेले तीन पिढ्यांचे सहकार, शिक्षण, सामाजिक, राजकिय, कृषी, पाणी, औद्योगिक क्षेत्रातील मोठे योगदान राहिलेले आहे. विवेक कोल्हे यांच्यासारखा तरुण आणि आश्वासक युवा चेहरा पक्षासोबत रहावा यासाठी पक्ष आग्रही आहे. कोपरगावसह शेजारील सहा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाचा प्रभाव असल्याने आपण पक्षात रहावे अशी चर्चा झाली. कोपरगाव मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालू व सर्वोच्च नेते देखील योग्य तो सन्मान ठेवत दखल घेतील हा विश्वास दिला, असे स्नेहलता कोल्हे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व पक्षात राहण्यासाठी आग्रह करीत असल्याची माहीती आ. स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी शुक्रवारी रात्री प्रमुख समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली होती.

विवेक कोल्हेंची भुमिका गुलदस्त्यात
दरम्यान, या घडामोडी घडत असताना विवेक कोल्हे मात्र चित्रात नाहीत. मुंबईत भाजपातील वरिष्ठांशी सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत या घडामोडींवर त्यांची कोणतीही प्रतिक्रीया समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांची भुमिका काय, याकडे समर्थक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या