अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झालेली मैत्री अखेर युवतीच्या फसवणुकीपर्यंत पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील तरूणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खराशी (ता. लाखनी, जि. भंडारा) येथील पीडित 21 वर्षीय युवतीने यासंदर्भात शनिवारी (4 ऑक्टोबर) पहाटे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून जहिद फारूख तांबोळी (रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, युवतीची ओळख सुमारे चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जहिद तांबोळी याच्याशी झाली होती. सुरूवातीला केवळ चॅट व फोनवरून संपर्क सुरू असताना, जहिद याने तिला विश्वासात घेऊन दोघेही लग्न करून संसार करू असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून युवतीने त्याच्याशी संपर्क सुरू ठेवला. सन 2024 मध्ये पुण्यात नोकरीच्या शोधात गेल्यानंतर जहिद याने तिला प्रत्यक्ष भेटून नातेसंबंध दृढ करण्याचे प्रयत्न केले. मात्र खरी घटना 16 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे उलगडली. त्यादिवशी जहिदने युवतीला केडगाव येथील लहर पान शॉप येथे बोलावून घेतले.
दुकानाचे शटर आतून बंद करून तिला लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर तो तिला अनेक दिवस पानटपरीत ठेवून बाहेर कुलूप लावून जात असे, असेही युवतीने पोलिसांना सांगितले. यानंतर 28 सप्टेंबर 2025 रोजी जहिद याने तिला समाधान लॉज, आरणगाव रस्ता येथे नेऊन पुन्हा शारीरिक संबंध ठेवले.
तेव्हा युवतीने लग्नाचा विषय काढल्यावर जहिदने वेळ मारून नेली. मात्र, पुन्हा लग्नासाठी विचारणा करताच त्याने शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी जहिद फारूख तांबोळीविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




