अहिल्यानगर (प्रतिनिधी)
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये सर्व सोशल मीडिया ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना कडक इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत. कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक बदनामी करणे, फोटोंशी छेडछाड (मॉर्फिंग) करून ते प्रसारित करणे किंवा जातीय व्देष पसरवणारे संदेश पाठवणे हा आता गुन्हा ठरणार आहे. विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुपवर चुकीचा मजकूर आल्यास केवळ पाठवणाराच नाही, तर ग्रुप अॅडमिनलाही कायद्याच्या कचाट्यात धरले जाईल.
राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे स्टेटस ठेवल्यास थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मतदान 15 जानेवारी आणि मतमोजणी 16 जानेवारीला होणार असून, तोपर्यंत सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी आपआपल्या हद्दीतील लोकांना सोशल मीडियाव्दारे ही नोटीस प्रसारित केली आहे.





