Friday, November 22, 2024
Homeनगरसोशल मीडियाच्या जमान्यातही पारंपरिक प्रचाराची पध्दती टिकून

सोशल मीडियाच्या जमान्यातही पारंपरिक प्रचाराची पध्दती टिकून

गावोगावी आजही भोंग्याच्या गाड्यांची क्रेज || व्यक्तीगत भेटीगठींवर उमेदवारांचा भर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आजचा जमाना हा सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप यासह अन्य माहिती तंत्रज्ञानाचा आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून माहिती आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात आजही गावोगावी चार चाकी गाडीवर भोंगा लावून प्रचार सुरू आहे. ‘ताई, माई, अक्का आमच्या उमेदवारांच्या नावावर मारा शिक्का’ या शब्दाच्या ऐवजी नवीन शब्दांचा वापर सुरू असला तरी सध्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून भोंग्याच्या गाड्यांचा वापर सुरू आहे. यासह विविध माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांसह प्रचार सुरू असतानाही प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीव्दारे उमेदवार प्रचार करत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी गटात अनेक पक्ष एकत्र येवून तयार झालेली आघाडी आहे. यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी झालेली असून परिणामी प्रत्येक मतदारसंघात प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची संख्या वाढलेली आहे. निवडणुकीत वाढलेल्या उमेदवारांनी कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एक काळ असा होता की कोणत्याही निवडणुकीत राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक चिन्ह असलेले झेंडे घेऊन रस्त्यांवर, गल्लोगल्ली कार, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये लाऊडस्पीकर लावून प्रचार करायचे. आता प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवार आपापल्या स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार करतांना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, व्हॉट्सअ‍ॅप, प्रचारासाठी तयार केले जाणारे विशेष अ‍ॅप, टीव्ही, वेबसाईट, टीव्ही जाहिराती, मालिकांमधून प्रचार किंवा एखाद्या कार्यक्रमात दिल्या जाणार्‍या जाहिरातींशिवाय अनेक सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रचार केला जात आहे. यामुळे जवळपास राजकीय पक्षांनीही कात टाकत पारंपरिक प्रचार ते सोशल मीडिया असा वॉर रूमपर्यंत वेगाने बदल केला आहे. त्यानंतर आता उमेदवारांमध्ये प्रचारासाठी स्वतंत्र खासगी सोशल मीडिया नेटवर्किंग संस्थांना काम देण्याचा कल वाढत आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग संस्था काही क्षणांतच मतदारांशी रीअल टाईम कनेक्ट ठेवत असल्याने मतदारांच्या भूमिका जाणून घेण्याचा मार्ग अधिक सुकर होत आहे.

टोपण नावानुसार प्रचार
सध्या जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात भाऊ, भैय्या, दादा, साहेब अशी टोपण नावानुसार प्रत्येक नेत्याची ओळख आहे. या टोपण नावाचा आधार घेत कार्यकर्ते सोशल मीडियात प्रचार करताना दिसत आहे. आपल्या नेत्याच्या फोटोखाली टोपण नाव टाकून कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. यामुळे प्रचारातील रंगत वाढतांना दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या