Saturday, November 23, 2024
Homeअग्रलेखसमाजही बदलत आहे

समाजही बदलत आहे

आज नवरात्रीची पाचवी माळ. मराठी मुलखात घरोघरी घटस्थापना झाली आहे. नवरात्रीच्या दहा दिवसात पृथ्वीतलावर देवीतत्वाचा वास असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. ठिकठिकाणच्या देवी मंदिरांच्या परिसरात यात्रा-जत्रा भरल्या आहेत. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होते.

दांडिया खेळण्याच्या उत्साहाने तरुणाई आनंदित आहे. नवरात्रीत कन्या पूजन करण्याची परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रात महिलांना देवीच्या रूपात पाहिले जाते. पुजले जाते. त्यांना सन्मान दिला जातो. हा जागर कायम सुरु ठेवावा. महिलांना सन्मान द्यावा. त्यांच्याशी माणुसकीचे वर्तन कायम करावे अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यांच्या भावनेशी समाज नक्की सहमत होईल. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात महिलांचे प्रमाण लोकसंख्येच्या ४८ टक्के आहे. नवरात्रीसारखे सार्वजनिक उत्सव महिलांप्रती असणाऱ्या समाजाच्या धारणा बदलण्यास नक्कीच सहाय्य्यभुत ठरतात. यात दुमत असणार नाही. महिलांना सन्मान देण्याबाबत समाजाचे वर्तन दुटप्पी आढळते. त्यात सहज बदल होणे महिलांना अपेक्षित आहे. सरकारांनाही याची जाणीव झाली असावी. महिला आरक्षण विधेयक संसदेत नुकतेच मंजूर झाले आहे. प्रलंबित असलेली जनगणना झाल्यानंतर ते अमलात आणले जाऊ शकेल असे मत जाणत्यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यांचा फायदा लाखो महिलांनी घेतला. अनेक महिलांमध्ये दुर्धर व्याधीची लक्षणे आढळली. त्यावर पुढील उपचार वेळेत करण्याची जाणीव महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झाली असावी. तसे झाले असेल तर ती त्या अभियानाची मोठीच उपलब्धी म्हणता येऊ शकेल. महिलांसाठी सरकारे त्यांच्या पातळीवर अनेक योजना जाहीर करत असतात. त्यापैकी किती अंमलात आणल्या जातात हा संशोधनाचा मुद्दा असला तरी जागरूक कुटुंबे त्याचा लाभ मिळवत असावेत. ज्यांना हक्क आणि अधिकार हवे असतात त्यांनाही त्याची जाणीव व्हायला हवी. त्यासाठी संघर्ष करण्याची हवी हे महिलांच्या मनावर सकारात्मक पद्धतीने बिंबवण्याचा प्रयत्न अनेक समाजसुधारकांनी केला. त्याला हळूहळू का होईना पण गोमटी फळे येऊ लागली असावीत. समाजाच्या रूढी आणि परंपरा महिलांना पाळाव्या लागतात. तथापि मासिक पाळीशी संबंधित काही रूढी आणि परंपरांचे महिलांच्या मानसिकता आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे महिलाही नाकारणार नाहीत . त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेतात. हुंड्यासारख्या रूढी देखील अनेक महिला नाकारतात. स्मिता घुगेसारखी महिला त्यापुढचे पाऊल टाकते. तिने हुंडा देणे नाकारले. त्या पैशात तिने तिचा गिर्यारोहणाचा छंद व्यवसायिकरित्या जोपासला. तिने किलीमांजारो शिखर सर केले. त्यावर हुंडा प्रथा समाजाने बंद करावी असा फलक झळकावला. बचत गट चळवळीच्या माध्यमांतून अनेक महिला स्वतःला आर्थिक स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करतात. महिला त्यांच्या सन्मानाची लढाई त्या लढतच आहेत. त्यांना सुजाण समाजाने साथ द्यावी अशीच सुप्रिया सुळे यांची अपेक्षा असावी. सुळेंनी लाखो महिलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाजही त्याला हळूहळू साथ देत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या