Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याCrime News : धक्कादायक! उमेदवारी अर्जावरून भाजपच्या दोन गटांत राडा; मध्यस्थी करणाऱ्या...

Crime News : धक्कादायक! उमेदवारी अर्जावरून भाजपच्या दोन गटांत राडा; मध्यस्थी करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याची हत्या

सोलापूर । Solapur

राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. भाजपच्या दोन गटांतील अंतर्गत वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वादाची ठिणगी पडली. या प्रभागातून शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपच्याच रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी सरवदे कुटुंबावर भाजपच्या एका गटाकडून मोठा दबाव आणला जात होता, अशी माहिती समोर येत आहे.

YouTube video player

गुरुवारी जोशी गल्ली परिसरात हा वाद विकोपाला गेला. रेखा सरवदे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदे गट आग्रही होता. या वादातून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा बंदोबस्त तैनात केला. मात्र, या गोंधळातच हिंसक वळण लागले.

मनसे नेते बाळासाहेब सरवदे हे दोन्ही गटांतील वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेले होते. मात्र, शिंदे गटातील समर्थकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. प्रभाग दोनमधील संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख यांच्या गटाकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “समाजात शांतता राहावी या उद्देशाने बाळासाहेब मध्यस्थीला गेले होते, पण तिथे त्यांची हत्या करण्यात आली,” असे इंगळे यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर सोलापूर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जेलरोड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत ४ संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संवेदनशील भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...