सोलापूर | Solapur
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH-65) शनिवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला आहे. पनवेलहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या कारला रात्री साधारण ११.४५ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात ५ भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीरपणे जखमी झाली आहे.
सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ गावाजवळ असलेल्या देवडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. एमएच ४६ झेड ४५३६ या कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार झाडावर जाऊन आदळली. या गाडीत सहा जण होते, त्यात तीन पुरुष व तीन महिला होत्या. जखमी भाविकांवर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे पोलीस काम करीत आहेत.
मोठी बातमी! भाजपचे जेष्ठ नेते, माजी मंत्री, राज पुरोहित यांचं निधन
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून अर्टिका कारने (क्र. MH-46 Z 4536) स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. रात्री ११:३० च्या सुमारास गाडी देवडी पाटीजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यापासून तब्बल १० ते १५ फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.
अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली.
मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. ज्योती जयदास टाकले (वय ३७ वर्ष, सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या असून, सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





