अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’ अंतर्गत सोलर पॅनल व सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवून, एका व्यक्तीने खातगाव टाकळी (ता. अहिल्यानगर) परिसरातील पाच शेतकर्यांना तब्बल 2 लाख 67 हजार 200 रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिक विजय भानुदास जपे (वय 52, रा. खातगाव टाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेंद्र माधव बोर्हाडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना 24 जानेवारी 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडली असून 4 नोव्हेंबर रोजी दुपारी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जपे यांना घरावर सोलर बसवायचे होते. त्यांनी राजेंद्र बोर्हाडे याच्याशी संपर्क केला. बोर्हाडे याने आपण ‘एपीएन’ सोलर कंपनीचा अधिकृत सब-डिलर असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. जपे यांनी 24 जानेवारी 2025 रोजी बोर्हाडे याला एक लाख 10 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तसेच, शेतकरी संदीप कुलट यांनी 44 हजार 500, नामदेव कळमकर यांनी 34 हजार 100, नारायण कुलट यांनी 44 हजार 500 व किसन सातपुते यांनी 34 हजार 100 रूपये रोख स्वरूपात दिले.
अशाप्रकारे बोर्हाडे याने एकूण दोन लाख 67 हजार 200 रूपये गोळा केले. पैसे देऊन महिना उलटला तरी सोलर पॅनल किंवा पंप बसवले नाहीत. बोर्हाडे याला फोन केल्यास तो पुढील आठवड्यात बसवणार आहे असे सांगून वेळ मारून नेत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय जपे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. बोर्हाडे याने विश्वासघात करून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार सांगळे पुढील तपास करत आहेत.
राहुरीच्या शेतकर्यांनाही लुबाडले
दरम्यान, पैसे देऊन देखील सोलर पॅनल, सोलर पंप बसविला जात असल्याने खातगाव टाकळी गावात चर्चा सुरू झाली. फिर्यादी व इतर शेतकर्यांनी राजेंद्र बोर्हाडे याच्याविषयी अधिक चौकशी केली असता त्याने राहुरी परिसरातही अशाच प्रकारे शेतकर्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात त्याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती फिर्यादी व इतर शेतकर्यांना मिळाली असल्याचे जपे यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.




