Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedकचऱ्याचे वर्गीकरण करा नाहीतर वेतन नाही

कचऱ्याचे वर्गीकरण करा नाहीतर वेतन नाही

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडून ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे उचलला जात असल्याचे पाहण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने आता त्याची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण केले नाही तर यापुढे वेतन दिले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

एकीकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथीचे रोग उद्‌भवू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आता स्वच्छता विभागाकडून निर्माण होणारा कचरा शंभर टक्‍के वर्गीकरण करूनच स्वीकारावा, त्यात हलगर्जीपणा केला तर वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांचे वेतन केले जाणार नाही, अशी तंबी महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

येत्या १ ऑगस्टपासून शहरात शंभर टक्के कचरा वर्गीकरणावर काम केले जाणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच त्याचे संकलन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. संबंधित वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांच्याकडून या कामात हलगर्जी करण्यात येऊ नये, तसे आढळून आल्यास अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन केले जाणार नाही, अशी तंबी प्रशासकांनी दिली आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, आपल्या वॉर्डात धर्मगुरू व इतर प्रतिष्ठित नागरिकांची मदत घ्या, परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व इतर घटकांची मदत घेऊन तसेच कॉर्नर मिटिंग घेऊन लोकांचे कचरा वर्गीकरणाबाबत प्रबोधन करा, पण कोणत्याही परिस्थितीत १ ऑगस्टपासून शंभर टक्के वर्गीकरण केलेला कचरा आणा अन्यथा वेतन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दंड आकारण्याचे आदेश
शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम जोरात सुरू असून सार्वजनिक ठिकाण, गार्डन आणि ओपन स्पेस या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. माजी सैनिकांना दंड आकारण्याचे अधिकार देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परंतु या दंडाच्या रकमेतून माजी सैनिकांना कमिशन न देता त्यांचे वेतन वाढवून द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त रणजीत पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, अपर्णा थेटे, विजय पाटील व सर्व वॉर्ड अधिकारी आणि वॉर्ड अभियंता यांची उपस्थिती होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या