श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मातापूरच्या शेतकर्यांच्या सोयाबीन चोरीचा तपास करताना अपर पोलिस अधिक्षक कार्यालयाने सोयाबीनसह शेळ्या चोरी करणार्या टोळीला जेरबंद केले आहे. तालुक्यातील मातापूर येथील विजय दिगंबर उंडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले एकूण 53 गोण्या पैकी अंदाजे 26 क्विंटल सोयाबीन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद उंडे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकातील अमंलदारांनी सापळा रचून सागर गोरख मांजरे, गणेश बाबुराव शिरोळे दोघे राहणार मातापूर, ता. श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा दिलीप भिमा जाधव, योगेश भुराजी भवर दोघे रा. सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक व प्रशांत मुरलीधर धात्रक, रा. तुळजाभवानी नगर, पंचवटी, नाशिक यांच्या समवेत केला असल्याची कबुली दिली.
या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली असून एकजण पसार झाला असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 67,410 रुपयांची 19 क्विंटल 26 किलोग्रॅम सोयाबीन हस्तगत केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोहेकाँ प्रसाद साळवे करत आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकातील अमंलदारांनी चौकशी करत असताना, आरोपींनी दि. 11 जून 2025 रोजी रात्री उंबरगाव शिवारातील शेडमधून 15 मेंढ्या, 1 बोकड व 1 शेळी चोरी केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सराईत असून त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात 6 राहुरी पोलीस ठाण्यात दोन श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन लोणी पोलीस ठाण्यात दोन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन असे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, संतोष दरेकर, सचिन धनाड, पो.ना. रामेश्वर वेताळ, संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे, पो.नि. नितीन देशमुख, समाधान सोळंके, प्रसाद साळवे, अजित पटारे, संभाजी खरात, सचिन दुकळे मच्छिंद्र कातखडे यांनी केली आहे.




