Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली; म्हणाले, कदाचित अचूक माहिती मिळविण्याची…

शरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली; म्हणाले, कदाचित अचूक माहिती मिळविण्याची…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांना संभाव्य धोका लक्षात घेत वाय सुरक्षा वाढवून झेड प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र आता शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी दिल्लीत यासंदर्भातील चर्चेसाठी काही अधिकारी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे. ही सुरक्षा नाकारण्याचे कारणही पवार यांनी सांगितल्याचे म्हंटले जाते.

- Advertisement -

यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ५५ सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असणार होते. झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या आहेत. सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे. तसेच, घरात सुरक्षा कडे नसावे, अश्या सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, नुकतीच केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी सकाळीच शरद पवार यांच्या घरी दाखल झाले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. मात्र सुरक्षा घेण्याच्या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही.

“गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारले तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी रास्वसं मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या